कल्याण : रस्त्यातील खड्डा चुकवताना तोल जाऊन डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याने एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना कल्याण मलंगरोड द्वारली परिसरात गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
सूरज गवारी असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव असून कल्याण पूर्व चिंचपाडा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
कल्याण मलंग रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्डे चुकवताना अनेकदा या रोडवर अपघात होत असतात. हे खड्डे बुजवून रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी केली जाते. मात्र महापालिका प्रशासनाकडून खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.
गुरुवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास दुचाकीस्वार या रस्त्याने जात होता. या दुचाकीस्वाराचा तोल गेला, तो थेट शेजारून जात असलेल्या डम्परच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. खड्डे चुकवत असताना त्याचा तोल जाऊन तो डम्परच्या मागच्या चाकाखाली आल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील चेतन पाटील यांनी केला.
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. गुरुवारी शहर अभियंत्यानी काही खड्ड्यांची पाहणी करत खड्ड्यांमुळे दुर्घटना घडल्यास संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला जबाबदार धरणार असल्याचे सांगितले होते. मात्र आता या रस्त्यावरील खड्ड्यांसाठी जवाबदार असलेल्या अभियंता आणि ठेकेदारावर काय कारवाई करतात हे पाहावे लागेल.