पोलीस आणि वनखात्याच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पर्यटकांना रोखले
नवी मुंबई: पर्यटकांना भुरळ घालणारा वनराईने नटलेल्या गवळी देव डोंगरावर पर्यटक वर्षा सहलीचा आनंद उपभोगण्यासाठी येतात. गेल्या आठवड्यापासून पावसाची धुंवाधार बरसात सुरू असल्याने रविवारी हजारोंच्या संख्येने पर्यटकांचे पाऊल या डोंगराकडे आपसूक वळले. मात्र प्रमाणाबाहेर गर्दी झाल्याने पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी काही काळ पर्यटकांना रोखून ठेवले. तरीही गर्दी वाढत असल्याने अधिकाऱ्यांना प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ आली.
गवळी देव आणि सुलाई देवी मंदिर परिसराचा विकास केला जात असल्याने या पर्यटनस्थळी गर्दी वाढत आहे. खासकरून वर्षा सहलीचा आणि येथील फेसाळणाऱ्या धबधब्याचा आनंद उपभोगण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी येतात. लोणावळा, माथेरान आणि अलिबाग या मुंबई नजीकच्या पर्यटन स्थळांवर वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून गवळी देव डोंगराची दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.
पांडवकडा धबधब्यावर पोलिसांनी बंदी घातल्याने गवळी देव डोंगर परिसर पर्यटकांना खुणावत असल्याने रविवारी या ठिकाणी मोठी गर्दी उसळली. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिस आणि वन विभाग सुरक्षा अधिकाऱ्यांनी तळ ठोकला होता. मात्र चोरवाट शोधून पर्यटक या शुभ्र प्रपाताचा आनंद लुटण्यासाठी कूच करीत होते. पावसाने विश्रांती घेतल्यावर देखील पर्यटकांची गर्दी पाण्याच्या डोहाकडे जाताना दिसत होती. कुटुंबीयांसह तरुण-तरुणी पर्यटन स्थळ गाठताना दिसत होते. शेजारच्या तेटवली या हिरवळीकडे प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले असताना पर्यटकांनी डोंगराच्या आडून असणारे प्रवेश शोधून या ठिकाणी जात होते.
पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत कर्मचारी आणि सुरक्षा व्यवस्था कमी असल्याने पर्यटकांच्या रोषाचा वन अधिकाऱ्यांना आणि पोलिसांना यावेळी सामना करावा लागला.
पावसाळ्यात या धबधब्यावर प्रशासन प्रवेश बंदी घालत असल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होतो. त्यामुळे नवी मुंबईसारख्या आधुनिक शहराला लाभलेल्या या पर्यटन स्थळांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करून ही पर्यटनस्थळे खुली ठेवली तर नवी मुंबई शहराच्या नाव लौकिकात निश्चितच आणखी भर पडेल, असे अध्यक्ष,पर्यावरण सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.