मोबाईलवर प्रतिसाद देत नाही म्हणून पत्नीला ठार मारण्याची धमकी

कल्याण: पत्नी मोबाईल संपर्काला प्रतिसाद देत नाही म्हणून पत्नीच्या कल्याण पश्चिमेतील खडकपाडा भागातील बुधवारी मध्यरात्री येऊन तिला आणि मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या आणि पत्नीला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती विरुध्द पत्नीने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

कार्तिकी संधानशिवे (४४) रा. राॅयसी सोसायटी, खडकपाडा असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. गिरीश संधानशिवे (४४) रा. अष्टविनायक वसाहत, मोहिंदरसिंग शाळेजवळ असे गुन्हा दाखल पतीचे नाव आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या दरम्यान पती गिरीश संधानशिवे हे दुसऱ्या विभागातील घरी राहत असलेल्या पत्नी कार्तिकाला सतत मोबाईलवर संपर्क करत होते. पत्नी मोबाईल संपर्काला प्रतिसाद देत नव्हती. त्यामुळे संतप्त झालेल्या पतीने रात्रीच्या वेळेत पत्नीच्या घरी जाऊन तू माझ्या मोबाईलला प्रतिसाद का देत नाहीस. तू कुठे गेली होतीस, असे प्रश्न केले. आपण शिर्डी येथे गेलो होतो, असे पत्नी कार्तिकीने पतीला सांगताच त्याचा त्यांना राग आला. त्यांनी पत्नी आणि मुलाला ठोशाबुक्क्याने बेदम मारहाण केली. जिवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक ए. एम. जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.