सौर ऊर्जेने उजळल्या ठाणे महापालिकेच्या शाळा

* साडेसहा लाख वीज युनिटची बचत
* वर्षभरात ३६ लाख रुपयांची बचत

ठाणे : सौर ऊर्जेने ठाणे महानगरपालिका पालिकेच्या ३८ शाळा उजळून निघाल्या असून मागील दीड वर्षात महापालिकेची सुमारे ३६ लाखांची बचत झाली आहे तसेच प्रदूषण कमी करण्यात यश आले आहे.

ठाणे महापालिकेच्या ११६ शाळा आहेत. त्यापैकी ३८ शाळांच्या गच्चीवर सौर ऊर्जेची सोय करणे शक्य होते. त्या शाळांची सौर ऊर्जा निर्मितीसाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार वर्तकनगर, चिरागनगर, घोडबंदर, मुंब्रा आदी ३८ शाळांच्या टेरेसवर २३४ किलो वॅटचे सौर ऊर्जेचे पॅनेल कोरोना सुरू होण्याच्या पूर्वी लावण्याचा निर्णय झाला होता. २०१९ साली या कामाला सुरुवात करून मार्च २०२०मध्ये हे काम पूर्ण करण्यात आले होते. कोरोना काळात शाळा बंद असल्याने प्रत्यक्ष सौर ऊर्जेचा वापर मार्च २०२२पासून सुरू करण्यात आला होता. तेव्हापासून आत्तापर्यंत सहा लाख ५८ हजार युनिट इतकी विजेची बचत करण्यात आल्याने ठामपाचे आत्तापर्यंत ३६ लाख ३९ हजार रुपयांची बचत झाली आहे. या शाळांमधील दिवे-पंखे यासाठी पारंपरिक विजेचा वापर केला जात नाही, त्यामुळे प्रदूषण कमी करण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे. सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर महापालिकेने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, महापालिका मुख्यालय तसेच इतर कार्यालयात केल्यामुळेच ठाणे महापालिकेला वसुंधरा पारितोषिक यावर्षी मिळाले होते.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागातील अधिकारी, कर्मचारी ठाणे महापालिकेची वीज बचत करण्यासाठी विविध योजना राबवून महापालिकेची बचत करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.