भाजीपाला बाजार आवारात नियमबाह्य पद्धतीने कांदा बटाट्याची विक्री?

नवी मुंबई: मुंबई कृषी उत्पन्न बाजार आवारातील भाजीपाला बाजार आवारात दिलेल्या परवानगीचा गैरफायदा घेऊन काही व्यापाऱ्यांनी कांदा, बटाटा, लसणाची विक्री सुरू ठेवली आहे. या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील कांदा-बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाशीतील कृषी उत्पन्न बाजारपेठ ही घाऊक बाजार म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी राज्य तसेच परराज्यातील शेतमाल, धान्य, मसाले आदी विक्रीसाठी येतात. त्यासाठी फळ, भाजी, कांदा-बटाटा, धान्य आणि मसाला मार्केट अशा पाच बाजार आवारात ही बाजारपेठ व्यापली आहे. त्या-त्या ठिकाणी त्याप्रमाणे मालाची विक्री होत असून इतर माल विक्रीस मनाई आहे. बाजार समिती मोठी असल्याने या ठिकाणी उपहार गृहे, हॉटेल आहेत. येथील हॉटेल, उपहारगृहात बाहेरील वस्तू आवकसाठी एपीएमसी प्रशासनाने विशेष परवानगी दिली आहे. अशाच परवानग्या भाजीपाला बाजार आवारातील उपहारगृह, हॉटेल आणि जेलमध्ये भाजीपाला पुरवठादार अशा एकूण २६ जणांना परवानग्या देण्यात आल्या आहेत. मात्र भाजीपाला बाजार आवारात अशा परवानग्यांचा काही व्यापाऱ्यांनी गैरफायदा घेत भाजीपाला आवारात थेट कांदा, बटाटा आणि लसणाची विक्री सुरू ठेवली आहे. त्यामुळे परवानगी नसताना देखील काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला बाजारात कांदा, बटाटा आणि लसणाची विक्री सुरू ठेवली आहे. या साऱ्या प्रकाराकडे एपीएमसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने येथील कांदा बटाटा बाजार आवारातील व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजीपाला बाजार आवारात तसेच प्रवेशद्वारावर नियमबाह्य पद्धतीने कांदा-बटाटा विक्री होत असल्याने आमच्यासारख्या घाऊक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याबाबत वारंवार एपीएमसी प्रशासनास तक्रारी केल्या आहेत. मात्र येथील व्यापारी आणि अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याने ठोस कारवाई होत नाही, अशी प्रतिक्रिया घाऊक व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.

भाजीपाला बाजार आवारातील उपहारगृह, हॉटेल आणि जेलमध्ये भाजीपाला पुरवठादार अशा एकूण २६ जणांना कांदा-बटाटा आवक आणि विक्रीसाठी परवानग्या देण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त इतर कुणी विक्री करत असेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल, अशी माहिती कैलास सावलकर, उप सचिव भाजीपाला मार्केट यांनी दिली.