इंदिरानगरमधील ‘त्या’ भूखंडावरील बांधकामाला स्थगिती

एमआयडीसीने बजावली भूखंड धारकास नोटीस

नवी मुंबई: तुर्भे इंदिरा नगरमधील उद्यानाचा भूखंड एमआयडीसीने खाजगी विकासकास विकला होता. यास स्थानिकांनी विरोध करत सर्वपक्षीय लढा उभारला होता. या लढ्यास यश आले असून या व्यवहाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्पुरती स्थगिती आदेश दिले होते. त्यानुसार महापे एमआयडीसी कार्यालयाने सदर भूखंडावरील बांधकाम स्थगित ठेवण्यासाठी नोटीस बजावली आहे.

नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसी भागात इंदिरानगर येथील भूखंड क्र.ओ- एस ७ हा एमआयडीसीने १९९७ साली नवी मुंबई मनपाला भाडेतत्वावर दिला होता. त्यावर परिसरातील नागरिकांसाठी महानगरपालिकेने लाखो रुपये खर्च करून उद्यान विकसीत केले होते. शिवाय या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य बसवले होते. मात्र फेब्रुवारीत सदर भूखंड भाकरे ब्रदर्स यांना एमआयडीसीने विकला. या विकासकाने तत्काळ ताबा घेत उद्यानातील वृक्ष आणि खेळणी तोडत आपले काम सुरु केले.

या विरोधात स्थानिक नागरिक, शिवसेना माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेना शाखा प्रमुख महेश कोटीवाले (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांनी आक्षेप घेतला. सर्व राजकीय पक्षांनी व नागरिकांनी एकत्र येत लढा सुरु केला. या बाबत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्यान भूखंड विक्रीला स्थगिती द्यावी, असे विनंती पत्र दिले. यावर भूखंड विक्री व्यवहाराला स्थागिती देण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार महापे एमआयडीसी कार्यालयाने भाकरे ब्रदर्स यांना सदर भूखंडावरील बांधकाम स्थगित ठेवण्यासाठी २१ जून रोजी नोटीस बजावली आहे.