मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे गेल्या वर्षी 7 ते 9 मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेमध्ये प्रमोद चौगुले याने सर्वसाधारण उमेदवारांमधून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर सोनाली म्हात्रे हिने मुलींमधून पहिला क्रमांक पटकावला आहे. विशाल यादव हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.
हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण 405 पदांकरीता उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.
राज्यसेवा 2021 सालचा अंतिम निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये सांगलीचा प्रमोद चौगुले सलग दुसऱ्यांदा राज्यात पहिला आला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर कोल्हापूरच्या शुभम पाटीलने बाजी मारली आहे. मुलींमध्ये बीडच्या सोनाली म्हात्रे हिने पहिला क्रमांक पटकवला असून एकूणात ती राज्यात तिसरी आली आहे. प्रमोद चौगुले हा सध्या उद्योग आणि उपसंचालक या पदावर नाशिक येथे कार्यरत आहे. गेल्या वर्षीही तो राज्यात पहिला आला होता.
राज्यात पहिला आलेल्या प्रमोदचे वडील टेम्पोचालक आहेत तर आईने शिवणकाम करून संसाराचा गाडा चालवला. 2020 मध्ये प्रमोद चौगुले याने एमपीएससीमध्ये पहिला येण्याचा बहुमान मिळाला होता आणि त्यानंतर त्याची उद्योग विभागात उपसंचालक म्हणून नियुक्ती झाली होती.
राज्यात दुसरा आलेला शुभम पाटील हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील साजनी या गावचा. शुभमचे वडील गणपती पाटील हे प्राथमिक शिक्षक तर आई गृहिणी. लहानपणापासून सरकारी अधिकारी व्हायचं हे शुभमचं ध्येय, आणि त्याला त्याच्या आई-वडिलांनी साथ दिली. शुभमने 2020 सालची राज्यसेवा परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो राज्यात 22 वा आला. अतिशय काटेकोरपणे अभ्यासाचे नियोजन केल्यामुळे शुभमला हे यश मिळालं. त्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या शुभमने यंदाच्या एमपीएससीमध्ये राज्यात दुसरा येण्याचा मान मिळवला.
बीड जिल्ह्यातील माजलगावच्या सोनाली अर्जुन मात्रे हिने एमपीएससी परीक्षेत बाजी मारली आहे. सोनालीने सर्वसाधारण यादीत तिसरी तर राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे. सोनालीच्या या यशामुळे परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सोनाली मात्रेचे वडील शेतकरी असून एका शेतकरी कन्येने हे यश मिळवल्याने तिचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे.