ठाण्यात ९८ अतिधोकादायक तर, २०० धोकादायक वृक्ष

ठाणे : ठाणे शहरात ९८ अतिधोकादायक तर, दोनशे धोकादायक वृक्ष असल्याची बाब महापालिकेच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यापैकी ७० अतिधोकादायक तर, १५० धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याचे प्रकार घडतात. यात विदेशी वृक्ष पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. अशा घटनांमध्ये काही नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. अशा घटना टाळण्यासाठी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी शहरातील वृक्षांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यात अतिधोकादायक आणि धोकादायक वृक्षांची नोंद करण्यात येते. हे वृक्ष उन्मळून पडून जिवीतहानी होऊ नये यासाठी ते हटविण्याची कारवाई करण्यात येते. यंदाही ठाणे महापालिकेने अशाचप्रकारे वृक्षांचे सर्वेक्षण केले आहे. त्यात संपुर्ण शहरात ९८ अतिधोकादायक तर, दोनशे धोकादायक वृक्ष असल्याची माहिती समोर आली असून त्यापैकी ७० अतिधोकादायक तर, १५० धोकादायक वृक्ष हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे. उर्वरित वृक्ष हटविण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय ७८२३ वृक्षांच्या फांद्यापैकी ४ हजारांच्या आसपास फांद्याची छाटणी करण्यात आली आहे.

वृक्षांच्या फांद्या तोड़ल्यानंतर त्या तातडीने उचलल्या जाव्यात आणि या कामावर देखरेख रहावी यासाठी वृक्षांच्या फांद्यांची वाहतूक करणाऱ्या डम्परवर जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.