रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला टाळे

कल्याण : सर्वसामान्य गरजू रुग्णांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे बाई रुक्मिणीबाई रुग्णालयात दहा बेडच्या अतिदक्षता विभागाला वैद्यकीय अधिकारी वर्गाची कमतरता भासू लागल्याच्या सबबीमुळे गाशा गुंडाळण्याची पाळी आली. यामुळे रुग्णालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासकीय राजवटीमध्ये रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारार्थ येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सोयीसुविधा मिळतील ही अपेक्षा फोल ठरल्याचे दिसून येत आहे. कोरोना काळात रुक्मिणीबाई रुग्णालयात शासनाने करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. एकीकडे शहरात ऑक्सिजनची कमतरता असताना रुक्मिणीबाई रुग्णालयात स्वतंत्रपणे ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना होण्याकरिता ऑक्सिजन प्लांटची स्वतंत्र व्यवस्था उभारण्यात आली होती. त्या अनुषंगाने अतिदक्षता विभागाची निर्मिती होत असताना रुग्णांच्या बेडपर्यंत ऑक्सिजन नळकांडीची जोडणी देखील देण्यात आली होती. अतिदक्षता विभागासाठी ऑक्सिजनची गरज रुग्णांना भेडसावू नये याकरिता ही यंत्रणा रुग्णालयाच्या मागील बाजूस बसवण्यात आली होती.

गेल्या आठवड्यात रुक्मिणीबाई रुग्णालयातील दहा बेडच्या सुविधेचे अतिदक्षता विभाग नोबेल एजन्सीला प्रायोगिक तत्त्वावर देत ते सुरू करण्यात आले. मात्र तीन-चार दिवसातच या एजन्सीला वैद्यकीय पथकाची उणीव भासू लागल्याने सुरू करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाला नाईलाजाने टाळे ठोकण्याची नामुष्की ओढवली आहे. रुग्णांच्या सुविधेसाठी ऑक्सिजन यंत्रणेचा स्वतंत्र प्लांट तयार करूनही याचा उपयोग प्रशासनाला करता आला नसल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रुक्मिणीबाई रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्गाची कमतरता असल्याने प्रशासनाने अतिदक्षता विभाग प्रायोगिक तत्वावर नोबेल एजन्सीला चालविण्यास दिले होते. मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या अपुऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांमुळे सुरू केलेले अतिदक्षता विभाग बंद पडले आहे.

मध्यंतरी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. भाऊसाहेब दांगडे यांची भेट घेत रुग्णालयातील कारभारात लक्ष घालण्याची प्रामुख्याने मागणी शिवसेनेने केली होती. कल्याण डोंबिवलीतील महापालिका क्षेत्रातील गरीब व गरजू नागरिकांसाठी रुग्णालय वैद्यकीय सेवेसाठी महत्वाचे असल्याने या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण तपासणी करता येत असतात. रुग्णांसाठी महत्त्वाचे समजले जाणारे अति दक्षता विभाग सुरू केल्यानंतर आठवड्याभरातच गाशा गुंडाळावा लागल्याने यामुळे प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

नोबेल एजन्सीने प्रशासनाला अतीदक्षता विभागाकरिता लागत असणारे वैद्यकीय पथक उपलब्ध होत नसल्याचे कारण देत विभाग बंद करत असल्याचे कळविले आहे. डॉ. संदीप पगारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अतिदक्षता विभाग एजन्सीकडून सुरू करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न असल्याचे सांगितले.

कल्याण-डोंबिवली मनपाक्षेत्राची लोकसंख्या सुमारे १८ लक्ष आहे. आज देखील रूक्मिणीबाई रूग्णालय, शास्त्रीनगर रूग्णालयावर आरोग्य सेवेची मदार असल्याने मल्टीस्पेशालिटी रूग्णालयाच्या घोषणा हवेत विरतानां दिसत आहेत. तळागाळातील वर्गाच्या आरोग्य विषयक सेवेसाठी ही रूग्णालये अद्ययावत होणे काळाची गरज असल्याची मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे.