नवी मुंबई: राज्यात विविध ठिकाणी औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरू असल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असताना आता नवी मुंबईतील वाशी परिसरात एका युवकाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी वाशी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी औरंगजेबाचे फोटो प्रदर्शन तसेच स्टेटस ठेऊन उदात्तीकरण सुरू असल्याने वाद निर्माण होऊन दंगलसदृश परिस्थिती तयार होत आहे. नुकतेच कोल्हापुरात अशा प्रकारे वाद झाल्याने ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईतही असाच प्रकार समोर आला आहे.
एका मोबाईल सेवा देणाऱ्या दुकानात काम करणाऱ्या ३२ वर्षीय युवकाने औरंगजेबचा फोटो असलेले स्टेटस ठेवत त्याचे उद्दात्तीकरण करणारा मजकूर ठेवला होता. हे लक्षात येताच त्याच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विश्व हिंदू परिषद, शिव शंभो प्रतिष्ठान, हिंदू सकल समाज संघटना आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते संध्याकाळी सात वाजल्यापासून जमा होऊ लागले होते. स्टेटस ठेवणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. सुरवातीला ही बाब लक्षात आल्यानंतर हिंदू संघटनांनी त्याच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेत त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी अधिक माहिती देताना सांगितले कि एका युवकाची चौकशी सुरु असून सध्या पोलीस ठाण्यात त्याला आणण्यात आले आहे. चौकशीनंतर त्याच्यावर कायद्यानुसार पुढील योग्य ती कारवाई केली जाईल.