संसद, वास्तू आणि विचार

भारतात नवीन संसदीय इमारतीचे उद्घाटन होत असताना आणि त्यावरील उलट सुलट मतप्रदर्शन वाचत असताना ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेरा येथील संसदीय वास्तुस भेट देण्याचा योग आला. कोणत्याही देशासाठी संसदेचे महत्त्व अनन्यसाधारण असते. सत्तेचे केंद्र म्हणून तिची ओळख असते,तेथून देशाचा कारभार हाकणारी यंत्रणा कार्यरत असते, मंत्री, नियोजनकर्ते अहोरात्र झटत असतात आणि त्यामुळे केवळ सत्ताकेंद्र नाही तर जनतेच्या आशा -आकांक्षाचा केंद्रबिंदू म्हणून या वास्तूकडे पाहिले जात असते. ऑस्ट्रेलियन संसदेची नवीन इमारत सुमारे ३० वर्षांपूर्वी बांधली गेली होती आणि ती साकारताना वास्तूविशारदांनी केवळ त्याच्या रचनात्मकतेकडे न पाहता लोकशाही संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचे पर्यावरण कसे निर्माण होईल याचा सखोल विचार आराखडे करताना केला होता. केवळ दगड, विटा, सिमेंट, रेती, लोखंड आदी बांधकाम साहित्य वापरून कोणतीही इमारत तयार होऊ शकते. संसदेच्या इमारतीत जनकल्याण, त्याबाबतची धोरणे त्यांची अंमलबजावणी करणारी प्रक्रिया आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीची तत्वे कशी जोपासली जातील याचा विचार वास्तु विशारदांनी करीत असतो. वासतुशास्त्राला तत्वज्ञानाची जोड कशी दिली जाते त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे कॅन्बेराची संसदीय वास्तु! ऑस्ट्रेलियाचा इतिहास, परंपरा, संस्कृती गतकाळातील प्रभावलक्षी ठळक घटना, यांचे प्रतिबिंब वास्तुच्या कानाकोपऱ्यात उमटलेले दिसते. ते या देशातील वातावरण, पर्यावरण अगदी समुद्रातील आढळणारी वनस्पती, वस्तूंचा वापर, ऑस्ट्रेलियन मानसिकतेशी एकसंघ होणारी रंगसंगती आदींचा विचार झाला आहे. लोकशाही तत्वांचे प्रतिबिंब त्यात कसे उमटेल हे पाहिले गेले आहे. फरशी असो की दारे खिडक्या लाकडाचा वापर, प्रत्येक गोष्टीत ऑस्ट्रेलियन भूमीत तयार होणाऱ्या वस्तूंचा उपयोग खुबीने केल्याचे आढळते. संसदेत आपल्या प्रमाणेच दोन सभागृह आहेत. त्यांना हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असे संबोधले जाते. आपल्याकडे असते तशी लोकसभा आणि राज्यसभा आहे. लोकांनी निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी लोकांसाठीच काम करत असतात की नाही हे पाहण्याची मोकळीक या वास्तू रचनेत अंतर्भूत करण्यात आली आहे. संसदेच्या भवनाच्या विस्तीर्ण छतावरून जनता फिरू शकते आणि तशी रचना करण्यामागचा विचार असा आहे की लोक हे त्यांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीमंडळापेक्षा मोठे आहेत. जनतेचे हे वर्चस्व अधोरेखित करण्याची कल्पना केवळ विलक्षण आहे असेच म्हणावे लागेल. संसदेच्या छतावरून लोक फिरत आहेत याचे भान लोकप्रतिनिधींना राहावे यासाठी ही रचना आहे.

ऑस्ट्रेलियाची राजधानी मेलबर्न अथवा सिडनी येथे असावी असे मतप्रवाह होते. परंतु या दोन्ही शहरांऐवजी अत्यंत सुनियोजित अशा कॅनबेरा शहराची निवड झाली. जागेची उपलब्धता हा ऑस्ट्रेलियासाठी समस्या नाही. मुबलक जागा आणि त्याच्पया तितकाच विचारपूर्वक वापर हे मात्र कनेक्शन फिरताना पदोपदी जाणवत होते.
वास्तुशिल्प शास्त्राची एक स्थितप्रज्ञता असते. तिचा वापर सत्ताकेंद्रात होत असताना ज्या गोष्टींचा सखोल विचार वास्तुविशारदाने केला तो मनाला स्पर्श करून जातो. या वास्तू जनतेच्या आशा आकांक्षांना मूर्त स्वरूप मिळणार असल्याने त्या अनुकूल वातावरण निर्मिती आणि कारभार करतानाचे साजेसे कार्यस्नेही वातावरण ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली गेली आहेत. ही वास्तू पाहताना प्रत्येक फ्रेम या गोष्टीची प्रचिती देते आणि मोकळ्या जागा लोकशाहीचे अवकाश कसे मोकळे असावे याची खात्री देत राहते. सर्वार्थाने एक वेगळी वास्तू पाहण्याचा आनंद आपल्याला मिळतो तो केवळ त्यांची सौंदर्य स्थळे हेरली गेली म्हणून नाही तर सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी अशा सुंदर विचारांनी या वास्तूला परिपूर्णता दिली आहे. म्हणून भारताची नवीन संसद घडवताना लोकशाही तत्त्वांचा असाच विचार झाला आहे की नाही हे बघावे लागेल. परंतु तूर्तास जे वाद या वास्तूच्या उद्घाटनानंतर चव्हाट्यावर येऊ लागले आहेत ते पाहता संसद नवीन झाली असली तरी विचारांचा ढाचा मात्र तीच राहिली आहे काय अशी शंका मनाला चाटून जाते.