ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने येऊरमधील मामा-भांजे डोंगरावरील अतिक्रमणे उघडकीस आणल्यानंतर वन विभागाने कारवाईचा बडगा उचलला असून अखेर हजरत पीर मामू-भांजे दरगाह ट्रस्टच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिनभरापूर्वी मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अतिक्रमणाविरोधात वनविभागाने कारवाई केली आहे. त्यामुळे लवकरच येऊरच्या मामा-भांजे डोंगरावरील मशिदीच्या अतिक्रमणांवर हातोडा पडणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वनक्षेत्रातील मामा-भांजे दर्ग्याच्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण करण्यात आले आहे. याठिकाणी दर्ग्याशेजारी मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी स्थानिकांनी मनविसेकडे केल्या आहेत. एरव्ही, एअर फोर्स स्टेशनच्या १०० मीटर परिसरात झाडे लावण्यास देखील मनाई असताना बिनदिक्कतपणे अशाप्रकारे अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. वायुसेनेच्या या युनिटच्या परिसरात मामा-भांजे दर्ग्यालगत काही अनोळखी लोक स्थलांतरित झाल्याने राष्ट्रीय सुरक्षिततेला देखील धोका निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत मनविसेच्या वतीने ‘लँड जिहाद’ विरोधात आवाज उठविला. धार्मिक स्थळावर वाढीव अतिक्रमण केल्याची तक्रार केल्यानंतर वनविभागाच्यावतीने या परिसरातील पंचनामा करून अहवाल तयार केला आहे. या अहवालामध्ये मामा कबर, भांजा कबर, मशीद, स्वच्छतागृहासाठी तसेच राहण्यासाठी पत्र्याचे शेड बांधण्यात आले असून लोखंडी ग्रील, दुकान, पाण्यासाठी लोखंडी टाकी, कब्रस्तान अशा एकूण १२०१ चौ.मी. जागेवर पत्र्याचे शेडचे अतिक्रमण केल्याचे समोर आले. या अहवालाच्या आधारे पाचपाखाडी येथील वनविभागाच्या वतीने भारतीय वन अधिनियम १९२७ कलम २६ (१), (अ)(ड)(इ) (फ) (ह) ६३ (ब) (क), वनसंवर्धन अधिनियम १९८० चे कलम २, महाराष्ट्र वन नियमावली १०, ११,१२, ८२ आणि वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ कलम ३५(६) (८) नुसार हजरत पीर मामू-भांजे दरगाह ट्रस्टच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच येथील अतिक्रमण हटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
भारतीय वायुसेनेसारख्या देशाच्या महत्वाच्या सुरक्षा यंत्रणेने मामा भांजा दर्गा शेजारील अनधिकृत बांधकामाबाबत सांगून सुद्धा महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी दुर्लक्ष करत आहेत. मनसेच्या इशाऱ्यानंतर पोलीस आम्हाला शासकीय पातळीवर कार्यवाही सुरू असल्याने कायदा हातात घेऊ नका, असे सांगतात. मात्र वन विभागाने गुन्हा दाखल करूनही आजतागायत कारवाई केलेली नाही. त्यामुळे लवकरच आम्ही शंकराच्या मंदीराचे भूमीपुजन करणार आहोत, असे संदीप पाचंगे यांनी सांगितले.