काश्मिरात नव्हे; ठाण्यातच लुटता येणार बर्फात खेळण्याचा आनंद

स्नो पार्कच्या प्रस्तावाला पुन्हा गती

ठाणे : मागील चार वर्षे कागदावर असलेला स्नो पार्कचा प्रस्ताव पुन्हा एकदा ठाणे महापालिकेने पुढे आणला आहे. कोलशेत येथील पार्क आरक्षणाच्या जागेत आता स्नो पार्क आणि अ‍ॅम्युझमेंट पार्कची मज्जा ठाणेकरांना घेता येणार आहे. हा प्रकल्प पीपीपी (खाजगी लोक सहभागातून) तत्वावर उभारण्यात येणार असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.

सन २०१६ मध्ये स्नो पार्कच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली होती, त्याची निविदा देखील काढण्यात आली होती. या पार्कच्या माध्यमातून ठाणेकरांना बर्फाशी संबंधित सर्व प्रकारच्या मनोरंजक सुविधा आणि खेळ तसेच बर्फाच्छादीत क्षेत्राचे विज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान मिळणार आहे. याशिवाय, विविध कार्यक्रम आणि प्रदर्शनांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार होती. कोलशेत येथील आरक्षण क्रमांक ५ या भूखंडावरील सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रफळावर हे पार्क विकसित करण्यात येणार होते. परंतु आता पुन्हा नव्याने हा प्रस्ताव पुढे आणण्यात आला आहे. त्यानुसार आता या ठिकाणी स्नो पार्क बरोबर आता अ‍ॅम्युझमेंट पार्कची भर घालण्यात आली आहे. त्यानुसार आता १ लाख ५० हजार चौरस मीटर क्षेत्रावर अ‍ॅम्युझमेंट पार्क आणि स्नो पार्क उभारले जाणार आहे. यासाठी पुर्वीची आरक्षित जागा आणि एच.सी.एम.टी.आर. क्षेत्र त्यासाठी एकत्रित करण्यात आले आहे. या माध्यमातून ठाण्यात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे मनोरंजनाचे ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

सुमारे ५०० लोक क्षमतेचा मुख्य स्नो पार्क, मुख्य स्नो पार्क करीता चेजींग रुम, कुलिंग क्षेत्र सोव्हेनियअर स्टोअर्स, डिजीटल व फोटोशॉप, फ्रेश रुम्स, टिकेटींग एरिया आदी सुविधा यामध्ये असणार आहेत.

अम्युझमेंट पार्कमध्ये सुमारे आठ ते दहा ड्राय राईडस, जसे कॉफी कप, सन अ‍ॅण्ड मुन, फैमिली रोलर, कोस्टर, सिक्स रिंग, रोलर फोस्टर, कोरीजील, स्टिंग टॉवर ४५ मीटर, ड्रॉप टॉवर, डिस्को कोस्टर जायंट व्हील, पेंन्ड्युलम आणि फॅन्टसी प्लॅनेट आदींचा समावेश असेल.

९ डी सिनेमा, एचडी सिनेमा, हॉरर हाऊस, मोटर मेज, इको पार्क व नेचर ट्रेल, पार्कींग प्लाझा, फुट पार्क, सोसेनियर शॅम्पस, डिपार्टमेन्टल स्टोअर्स, एक्झिबिशन हॉल, फॅशन हॉल बॅन्केव्ट, इनडोअर अ‍ॅक्टीव्हीटीज, हॅप्पी स्ट्रीट आदीचाही यात समावेश असेल.

या प्रकल्पासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडून संपूर्ण आराखडे, नकाशे, अंदाजखर्च, प्रकल्प कालावधी, निविदा प्रक्रिया आदींसह इतर कामे करुन घेतली जाणार आहेत. त्यासाठी सल्लागाराला १ कोटी १८ लाख ९६ हजार ५५४ रुपये दिले जाणार आहेत. परंतु ही रक्कम सुध्दा विकासकाकडून दिली जाणार आहे.