अवकाळीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले
शहापूर: मार्चमध्ये झालेल्या अवेळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शहापूर तालुक्यातील २६५ शेतकऱ्यांच्या पिकांचे अधिकृत पंचनामे झाले असले तरी १९ मार्च २०२३ नंतर झालेला अवेळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या शेतक-यांना भरपाई कशी मिळणार याबाबत बाधित शेतकरी शंका उपस्थित करत आहेत.
राज्यात झालेल्या अवेळी पावसाची झळ शहापूर तालुक्यालाही बसली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये तालुक्यातील शहापूर मंडळातील ३५, किन्हवली मंडळातील ९५ आणि खर्डी मंडळातील १३६ शेतक-यांच्या ५,६४२ गुंठे क्षेत्राला फटका बसला आहे. मात्र या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे झाले असले तरी शासन निर्णयानुसार १९ मार्चनंतर झालेला अवेळी पाऊस आणि वादळी वा-यामुळे आमच्याही भाजीपाला व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे आम्हालाही शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, असे बाधि लत शेतकऱ्यांनी ‘ठाणेवैभव’शी बोलतांना सांगितले.
अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने १० एप्रिलला काढलेल्या शासन निर्णयात असे म्हटले आहे की, राज्यात ४ ते ८ मार्च आणि १६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत पडलेल्या अवेळी पावसामुळे मुख्यत्वे: शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अवेळी पाऊस ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती आहे. दरम्यान शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यात १९ मार्च नंतरदेखील वादळी वारा व अवेळी पाऊस पडला होता. किंबहूना या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासन निर्णयात दिलेल्या तारखांचा फटका बसतो की काय अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र असे न होता सर्वच बाधित शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी समाजमाध्यमातून होत आहे.
१९ मार्चनंतर झालेल्या अवेळी पावसाने व वादळी वाऱ्याने ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांनी तालुका कृषी कार्यालयात अर्ज करावा, जेणेकरून त्यांचे तत्काळ पंचनामे करून वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करता येईल.- आर.बी.खाडे, कृषी पर्यवेक्षक, शहापूर
या गावांतील शेतकरी झाले बाधित
मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तालुक्यातील प्रामुख्याने शिरगाव, नडगाव (जा), लेनाड, बावघर, साने, सारमाळ, खराडे, अंबेखोर, हिव, अंदाड, कासगाव, धसई, शिलोत्तर, शिवनेर, जांभे, नेहरोली, अस्नोली, शिल, शेलवली, कांबे, गुंडे, वेहालोली, कांबे, वाचकोले, नडगाव (सो), अल्याणी, दहीवली, कळगाव, चिंचवली, वाशाळा, उंबरखांड, विहीगाव, कोथळे, सुसरवाडी, पाटोळ, वेळुक, अजनुप, साखरोली, पेंढरघोळ, कानविंदे, लाहे, बिरवाडी, मोहीली, वेडवहाळ, दहिगाव, टेंभा, आटगाव, गोलभन, जरंडी, पिंपळपाडा, वरस्कोल, खर्डी, चांदे, रातांधळे आणि कुकांबे या गावातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.