कळवा-मुंब्रा मतदारसंघात शिवसेनेची मुसंडी
ठाणे: कळवा-मुंब्रा मतदार संघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसला शह देण्यासाठी शिवसेनेने कळवा-मुंब्रा विकास आघाडीच्या माध्यमातून या परिसराचा विकास करण्यासाठी तब्बल ५५ कोटींचा निधी दिला आहे, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कळवा-मुंब्रा या भागातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी खास बाब म्हणून ५५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी मुंब्रा येथील एमआयएम, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी खा.श्री. शिंदे यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. कळवा-मुंब्रा परिसरातील रस्ते पायवाटा, उद्यान, मैदान, स्वच्छता गृह आदी कामे या निधीतून केली जाणार आहे.
कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना शह देण्यासाठी शिवसेनेने ही खेळी खेळली असल्याचे बोलले जात आहे. या भागाचा विकास आ.आव्हाड यांनी केला असे जे चित्र उभे केले जाते, ते पुसून टाकण्याची व्यूहरचना शिवसेना करत आहे. १ मे रोजी शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक गळाला लावला होता तर मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर नगरसेवकांनी मुंब्रा विकास आघाडी करून आ.आव्हाड यांना आव्हान दिले होते. मुंब्रा विकास आघाडीच्या सदस्यांना बळ देण्यासाठी ५५ कोटींचा निधी देऊन राष्ट्रवादी आणि इतर पक्षातील नगरसेवक फोडण्याचा यापुढेही शिवसेना प्रयत्न करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कळवा पूर्व पश्चिम जोडणाऱ्या रेल्वे उड्डाणपूल उदघाटनाच्या वेळी शिवसेनेने १०० टक्के शिवसेनेचे नगरसेवक कळव्यातून निवडून आणण्याचे मिशन जाहीर केले होते. त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत, असे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के म्हणाले.