ठाणे : ठाणे महापालिकेच्या बेशिस्त आणि कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, त्यांच्यावर लक्ष राहावे यासाठी त्यांच्या हातात ट्रेकर घड्याळ बसवण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र गेल्या तीन वर्षात अवघ्या 10 टक्केच कर्मचाऱ्यांच्या हातात हे ट्रेकर घडयाळ लागले आहे. अजूनही 90 टक्के कर्मचारी प्रशासनाच्या रडारबाहेर आहेत.
कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्यासाठी तसेच कामाच्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत काही दुर्घटना घडल्यास त्यांची त्वरित माहिती कळण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हाती डीजीटल ट्रेकर घड्याळ बांधण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु मागील तीन वर्षात चार हजार कर्मचाऱ्यांपैकी केवळ ४०० कर्मचाऱ्यांच्या हातीच हे घड्याळ बसविण्यात पालिकेला यश आले आहे. याचाच अर्थ अवघे १० टक्के काम पालिकेने आतापर्यंत केले आहे.
स्वच्छता मोहीमे अंतर्गत विविध उपक्रम ठाणे पालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना हातात डिजिटल घड्याळ देण्यात येत आहे. पालिकेचे सुमारे चार हजार साफसफाई कर्मचारी आहेत. त्यात खाजगी तत्वावरील सफाई कामगारांचा देखील समावेश आहे. परंतु काही वेळेला हजेरी शेडवर हजेरी लावून कर्मचारी गायब होत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे वाढल्या होत्या. अथवा आपल्या जागी दुसरा कर्मचारी दाखवून दुसरीकडे कामाला जात असल्याचेही दिसून येत होते. त्यामुळे अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे. कर्मचाऱ्यांवर वॉच ठेवण्याबरोबरच हे ट्रॅकर कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणार आहे. सफाई कामगार हे जीवावर उदार होऊन काम करीत असतात. त्यामुळे त्यांचे आरोग्य देखील तितकीचे महत्वाचे आहे. त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, त्यांना आरोग्याच्या सोयी-सुविधा तत्काळ उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने देखील हे ट्रॅकर काम करणार आहे.
त्यानुसार तीन वर्षापूर्वी ही योजना पुढे आणण्यात आली होती. परंतु दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर आता सहा महिन्यापूर्वी संबंधित ठेकेदाराला त्याचे कार्यादेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहा महिन्यात चार हजार पैकी केवळ ४०० कर्मचाऱ्यांच्या हाती घड्याळ बांधण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर अंकुश पालिका कसा बसवणार याबाबत शंका उपस्थित झाली आहे.
पालिकेवर दरमहा 17 लाखांचं भार
कर्मचारी हातात घड्याळ बांधत नसल्याने आता पालिका अधिकारी हे घड्याळ हाती बांधणार आहेत. ही योजना चांगली मानली जात असली तरी देखील पालिकेला एका घड्याळापोटी दरमहा ४२१ रुपये ठेकेदाराला मोजावे लागणार आहेत. त्यानुसार चार हजार घड्याळांसाठी पालिकेच्या तिजोरीवर दरमहा १६ लाख ८४ हजार रुपयांचा भार पडणार आहे.