नवी समिती निश्चित करणार फेरीवाल्यांच्या जागा

ठाणे : फेरीवाल्यांची नवी समिती निवडण्यासाठी लवकरच निवडणूक होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेने १३६७ फेरीवाल्यांची यादी अंतिम केली असून ही यादी कामगार आयुक्तांना पाठवण्यात आली असून निवडणुकीसंदर्भात पत्रव्यवहारही कामगार आयुक्तांसोबत करण्यात आला आहे. अंतिम यादीत असलेले १,३६७ फेरीवाले या निवडणुकीत मतदान करणार असून त्यानंतर नवी समिती गठीत होणार आहे. नवी समिती अतित्वात आल्यानंतर ठाण्यात फेरीवाल्यांच्या बसण्याच्या जागा निश्चित करण्याचे अधिकार याच समितीला असणार आहे असे पालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

फेरीवाला धोरण न झाल्याने महापालिका हद्दीत मागील काही वर्षात फेरीवाल्यांची संख्या कईक पटीने वाढल्याचे दिसून आले आहे. रस्ते, फुटपाथ या फेरीवाल्यांनी व्यापल्याचे दिसत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्यासाठी फेरीवाला धोरण राबविण्यात येत आहे. दरम्यान २०१९ मध्ये ठाणे महापालिकेने केलेल्या सर्व्हेच्या आधारे ठाणे शहरात केवळ ६ हजार फेरीवाल्यांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यामध्ये केवळ २ हजार फेरीवाल्यांनी आपले पुरावे प्रशासनाकडे जमा केले असल्याचा दावा त्यावेळी प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला होता. दरम्यान आता फेरीवाला धोरण अंतिम करण्यात फेरीवाल्यांची संख्या १३६७ एवढी निश्चित झाली आहे.

दरम्यान सध्या ३० जणांची फेरीवाल्यांची समिती अस्तित्वात आहे. मात्र आता नव्याने कमिटी तयार होणार असून त्यात २० जणांचा समावेश असणार आहे. यात फेरीवाल्यांचे ८ प्रतिनिधी, ५ शासकीय प्रतिनिधी आणि उर्वरीत हे सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी असणार आहे. त्यानुसार या समितीची निवडणुक घेण्यासंदर्भात महापालिकेने कामगार आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर आता येत्या काही दिवसात ही निवडणुकीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. परंतु फेरीवाला कमिटीमध्ये कोण कोण असेल कोणाला निवडुन द्यायचे याचा निर्णय फेरीवाले मतदान करुन घेणार आहेत. निवडणुक प्रक्रिया पार पडल्यानंतर या समितीच्या माध्यमातून फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या जाणार आहेत. त्या त्या प्रभाग समितीनुसार यासाठी काही रस्ते शोधण्यात आले आहेत. त्याठिकाणी फेरीवाल्यांना आपला हक्काचा व्यवसाय करता येणार आहे.