चला, आपण ‘सचिन’ होऊया!

अवघ्या क्रिकेट विश्वाचा लाडका आणि भारतीय क्रिकेट रसिकांच्या गळ्यातला ताईत बनलेला भारतरत्न सचिन तेंडुलकर उद्या २४ एप्रिल रोजी ५० वर्षांचा होत आहे. क्रिकेटच्या परिभाषेत अर्ध-शतक. कुरळे केसांचा,पोरसवदा, टिपिकल मुंबईकर दिसणारा सतरा वर्षे आणि १०७ दिवस वयाचा असताना १९९० मध्ये नाबाद ११९ धावा पटकावणारा आपला सचिन आता पन्नाशीचा होत आहे यावर त्याच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या भक्तांचा विश्वास बसणे तसे कठीणच. त्यांच्यासाठी कालचक्र फिरत राहणे निसर्गाला अनुसरून असले तरी सचिनच्या बाबतीत मात्र असंख्य रोमांचकारी आठवणींसह स्तब्ध रहावे असे त्यांना मनोमन वाटत आहे. त्यांना त्याची पन्नाशी डायजेस्ट होणे म्हणूनच कठीण. क्रिकेटच्या मैदानात कसोटी सामन्यात ६८ आणि एक दिवसीय सामन्यात ९६ अर्धशतके झळकावणाऱ्या सचिनचे हे अर्धशतक कधीच होऊच नये असे वाटणे त्याच्यावर जडलेल्या अपरंपार प्रेमापोटीच! शतकांचे शतक नोंदवणाऱ्या या विश्वविक्रम वीराचे एकाहून एक अफलातून किस्से तज्ञ मंडळींनी त्याच्या चाहत्यांना नजराणा म्हणून पेश केले आहेत. जुन्या आठवणींना उजाळा देताना मला मात्र असे वाटून गेले की जगातल्या एकाहून एक खतरनाक गोलंदाजांची झोप उडवणाऱ्या सचिनने त्या सर्वांचा खरपूस समाचार घेतला तो त्यांच्यातील मर्यादा ओळखून आणि मग आपल्या शैलीत योग्य तो बदल करून. मध्यमवर्गीय माणूस डोईजड होत चाललेल्या ‘सिस्टीम’चा अशाच काहीशा प्रकारे समाचार घेऊ शकेल काय? आपण सचिन होऊन या अक्राळ विक्राळ ‘सिस्टीम’ नामक गोलंदाजावर मात करू शकू काय?

क्रिकेटच्या दुनियेतील अत्यंत अभ्यासू आणि चोखंदळ, रसिकांच्या पसंतीला उतरलेले लोकप्रिय समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे एक पुस्तक ‘शतकात एकच…. सचिन’ हे मे महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणार आहे. ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकात सचिनच्या फलंदाजीचे कंगोरे नोंदवताना संझगिरी यांनी काही किस्से सांगितले आहेत. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन याच्या बाबतीतला आहे. ज्याला नुसते पाहूनही भल्याभल्या फलंदाजांची पाचावर धारण बसत असे, त्याच्या समोर चार शतके झळकावणे सोपे काम नव्हते. परंतु सचिनने स्टेनला नमवले आणि शक्तीपेक्षा युक्ती मोठी हा लहानपणापासूनचा बोधकथेतला संदेश प्रत्यक्षात आणून दाखवला.

स्टेन हा स्विंग गोलंदाज होता. त्यासाठी तो विशिष्ट ठिकाणी टप्पा टाकत असे. सचिनने त्याची ही व्यूहरचना ओळखली आणि तो यष्टीपासून एक-दीड यार्ड पुढे उभा राहून स्टेनचा सामना करू लागला. हे काम जोखमीचे होते, कारण प्रचंड वेगाने येणारा चेंडू थेट शरीरावर आदळून फलंदाज जायबंद होण्याची भीती होती. पण सचिन डगमगला नाही. त्याने स्टेनची लय तोडली. त्याला निष्प्रभ ठरवले. शतकेही झळकवली. स्टेन हा जर ‘सिस्टीम’चा प्रतिक मानला तर त्याचा बंदोबस्त सचिनसारखी हुशारी दाखवून आपण सर्वसामान्य नागरीकरण करू शकणार नाही का असे संझगिरी यांचा लेख वाचताना वाटून गेले!

भारतीय नागरिकांना मतदार म्हणून जेव्हा फलंदाजी करण्याची संधी मिळेल तेव्हा त्यांनी स्टेन-सचिन यांचा हा अफलातून किस्सा स्मरावा! राजकारण्यांकडून केली जाणारी दडपशाही, दादागिरी, गुंडगिरी मतांसाठी दाखवली जाणारी प्रलोभने, दहशतवाद यांना भीक न घालता धिरोदात्तप्रमाणे दोन पावले पुढे होऊन सामोरे जावे. प्रसंगी तसे करताना जातीपातीचे, व्होट बँकांचे राजकीय बाउंसर अथवा स्विंग नैतिकतेचे फटके मारून बाजूला सीमापार धाडावेत. तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात भले मास्टर ब्लास्टर होण्याची संधी मिळणार नाही, पण चुकीच्या लोकांना डोक्यावर बसवण्याचे पातक तरी तुमच्या हातून होणार नाही. अशा मतदारांना लोकशाहीचे भारतरत्न असे म्हणता येऊ शकेल. चला तर मग आपण ‘सचिन’ होऊया! दोन पावले पुढे उभे राहूया.