ठाण्यात ५०० श्वानांचे लसीकरण

भटक्या श्वानांच्या गळ्यात रेडियम पट्टा

ठाणे शहर मनसे आणि पॉज या संस्थेचा उपक्रम

ठाणे: ठाणे शहरातील भटक्या श्वानांची दहशत वाढत असून जिल्ह्यात सुमारे ३.५ वर्षात एक लाख लोकांना श्र्वानांनी चावा घेतला आहे. पालिका स्तरावर होणाऱ्या लसीकरणाबाबत उदासिनता दिसून येत असून ठाणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर आणि पॉज या संस्थेच्या वतीने ठाणे शहरात ५०० भटक्या श्वानांचे अँटी रेबीज लसीकरण करून या श्वानांचे अपघात टाळण्यासाठी त्यांच्या गळ्यात रेडियम बेल्ट घालण्यात आले.

ठाणे शहरातील माजिवडे, कोपरी, नौपाडा, पोखरण २, लोकमान्यनगर या परिसरात भटक्या श्वानांची दहशत वाढली असून या परिसरातील अनेकांना श्र्वानांनी चावा घेतला आहे. शहरात गेल्या तीन वर्षात साडेचार हजार नागरिकांना चावा घेतल्याची नोंद आहे. ठाणे महापालिकेच्या वतीने भटक्या श्वानांना रेबीज लसीकरण केले जात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भटक्या श्वानांचा बंदोबस्त व निर्बिजीकरणाचा कायदा आहे. याबाबत कायद्यामध्ये मोकाट, भटक्या आणि पिसाळलेल्या श्वानांचा कसा बंदोबस्त करावा याचे निर्देशही देण्यात आलेले आहे. मात्र पशु वैद्यकीय विभाग याबाबत कासवगतीने कारवाई करत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पशुवैद्यकीय विभाग या भटक्या श्वानांबाबत कोणतीच कारवाई करत नसल्यामुळे काही सामाजिक संस्थांच्या वतीने भटक्या श्वानांना लसीकरण केले जात आहे.

पालिकेच्या निर्बिजीकरण केंद्रात केवळ चार ते पाच श्वानांवरच नसबंदी केली जाते. प्रत्यक्षात दिवसाला ७० ते ८० श्वानांवर होणे आवश्यक आहे. तसेच अनेक वेळा पालिकेचे टेंडरची मुदत संपली की हे केंद्र काही काळ बंद राहते. त्यामुळे दिवसेंदिवस भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.