केडीएमटी सोसते दरवर्षी ३२ कोटींचा तोटा

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा परिवहन उपक्रम पालिकेचा पांढरा हत्ती बनला आहे. परिवहन उपक्रमाला दैनंदिन उत्पन्न अंदाजे साडे सहा ते सात अपेक्षित आहे मात्र या उलट तोटा साडे आठ ते नऊ लाख इतका होत आहेत. महिन्याकाठी अडीच कोटीहून अधिक तर वर्षाला बत्तीस कोटींचा तोटा परिवहन उपक्रमाला सहन करावा लागत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

महापालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परिवहन उपक्रमातील नादुरुस्त, तुटक्या आणि रस्त्यावर बंद पडणाऱ्या बसेस या दिव्यातून प्रवाशांना प्रवास करावा लागतो. सद्यस्थितीला केडीएमटी उपक्रमाच्या ताफ्यात १४५ बसेस असून या पैकी ९० बसेस सुस्थितीत असून उर्वरित ५० नादुरुस्त बसेस अनुदाना अभावी कार्यशाळेत दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. परिवहन उपक्रमातील ४२ मार्गांपैकी विविध ३८ मार्गावरील नवी मुंबई, भिवंडी, पनवेल, मलंगगड तसेच कल्याण-डोंबिवली शहरातील अंतर्गत मार्गावर ९० बसेस धावत असतात. दररोज सुमारे पन्नास ते पंचावन्न हजाराहून अधिक प्रवासी परिवहन उपक्रमाच्या बसेसमधून प्रवास करीत आहेत.

परिवहन उपक्रमाच्या एका बसला इंधन, मेंटनेन्स अन्य खर्च असा प्रति किलोमीटर मागे ९८ रुपये खर्च येत असून त्यापैकी केवळ एका बसचे प्रतिकिलो मिटर ४२ रुपये इतकेच उत्पन्न मिळत आहे. उर्वरित ५६ रुपये प्रति किलोमीटर परिवहन उपक्रमाला तोटा सहन करावा लागत आहे.

परिवहन उपक्रमातील कार्यरत असलेल्या एकूण बसेस १५ ते १६ किलोमीटर फेऱ्या मारत असल्याने प्रति ५६ रुपये तोट्यानुसार दर दिवशी आठ लाख ९६ हजार रुपये तोटा उपक्रमाला होत आहे. दुसरीकडे मात्र दैनंदिन मार्गस्थ असलेल्या अंदाजे ९० बसेसचे उत्पन्न कधी पाच ते सहा लाख तर कधी त्याहून कमी होत असते.

पालिका प्रशासनाकडून परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी तसेच बसेसच्या मेंटेनन्ससाठी दीड कोटी रुपये अनुदान दिले जाते. परिवहन उपक्रमाचा इंधनावरच वर्षाला ९ ते १० कोटी रुपये खर्च होत असल्याने अनेक दिव्यातून परिवहन उपक्रमाचा गाडा उपक्रमाला हाकावा लागत आहे.

एकीकडे इंधनाची दरवाढ, शहरातील अवैध प्रवासी वाहतूक, स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी याचा परिणाम परिवहन उपक्रमाच्या बसेसच्या उत्पन्नावर होत असून यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाने उपाय योजना करण्यास सुरुवात केली आहे.

महापालिकेच्या नजीकच्या भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील प्रवाशांची परिवहन उपक्रमाच्या बसेसला मागणी असल्याने पीएमपीएलच्या धर्तीवर एसपीव्ही म्हणजेच स्पेशल परपज वेहिकल बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन परिवहन उपक्रमाने केले असून त्या संदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.