रेपो रेट वाढवू नका; ‘क्रेडाय’ची मागणी

मुंबई: रिअ‍ॅल्टी कंपन्यांची सर्वोच्च संस्था असलेल्या कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडियाने रिझर्व्ह बँक ऑफ इंड‍ियाला एमपीसीमध्ये रेपो दर वाढवू नयेत, असे आवाहन केले आहे.

रेपो रेट वाढल्याने बिल्डर आणि ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल आणि येणाऱ्या काळात याचा घरांच्या विक्रीवरही प्रणाम होईल. अमेरिकेसह बहुतेक देशांमध्ये मध्यवर्ती बँका दर वाढवत आहेत. तसेच, देश पातळीवर किरकोळ चलनवाढ मध्यवर्ती बँकेच्या 6 टक्के या समाधानकारक पातळीच्याही वर आहे, असे क्रेडाईने म्हटले आहे.

गेल्या एका वर्षात रेपो रेट चारवरून 6.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. आणि यात आणखी वाढ झाल्यास, कर्ज आणखी महाग होईल, असे क्रेडाईने म्हटले आहे.

क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन पटौदिया म्हणाले, ‘गेल्या एका वर्षात, आरबीआयने (RBI) रेपो रेटमध्ये वृद्धी केल्याने बांधकाम खर्च वाढला आहे. यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या डेव्हलपरच्या अडचणीत वाढ झाली आहे. रेपो रेट आणखी वाढवल्याने काही प्रकल्प पूर्ण करणे आर्थिक दृष्ट्या अवघड होईल आणि होम लोनचे दर सर्वकालिक उच्च पातळीवर पोहोचल्याने घरांची खरेदी करणारेही मागे सरकतील.’