ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित
आंबा, चिकूच्या बागांचेही नुकसान
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील हजारो शेतक-यांना अवकाळी, लहरी पावसाचा जोरदार फटका बसला असला तरी, त्यांना शासकीय नियमानुसार मदत मिळणार नाही, हे 33 टक्क्यांच्या नियमामुळे स्पष्ट झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात मुरबाड आणि शहापूर तालुक्यातील हजारो शेतक-यांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. आंबा, चिकूच्या बागा लावलेल्या शेतक-यांचेही मोठे नुकसान झाले आहे. अशा उत्पादक शेतक-यांना विमा मिळणार आहे. मात्र त्यांना मदत मिळण्यासाठी मे महिन्यापर्यंत थांबावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
ज्या शेतक-यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, त्यालाच मदत मिळणार हा नियम असल्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतक-यांना मदतीपासून वंचित रहावे लागणार आहे. सरकारी पंचनाम्यात तशी नोंद करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून कळते.
ठाणे जिल्ह्यात ६५ हजार ९०९ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आणि १ लक्ष ५७ हजार ९४९ मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक ठेवला आहे. या हंगामासाठी २,५७८ किलो प्रति हेक्टर उत्पादकतेचा लक्षांक निश्चित करण्यात आला.
भात आणि नागलीची काढणी याआधीच झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतक-यांचे नुकसान झाले नसल्यामुळे त्यांनी सुटकेचा श्वास सोडला. तर काही शेतक-यांनी पालेभाज्या आणि तृणधान्यांची लागवड केली. शहापूर, मुरबाड आणि कल्याण ग्रामीण परिसरात शेतक-यांचे नुकसान झाल्याचा अंदाज होता. सरकारी अधिका-यांनी जेथे पंचनामे केले होते, त्यात काही ठिकाणी १० ते १५ टक्के नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे जिल्ह्यात यंदा २२६० हेक्टर क्षेत्रावर नागली,१२१० हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्य, ८८० हेक्टरवर उडीद, १९० हेक्टरवर मुग, १३२० हेक्टरवर तूर, २३७ हेक्टरवर गळीत धान्य पिके, ५३३ हेक्टरवर इतर कडधान्याची लागवड झाली आहे.
काही ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याने कारली १५३. ४३ हेक्टर, दुधी भापळा २५.२५ हेक्टर , वांगी १६१. २९ हेक्टर, ढोबळी मिरची २६४ हेक्टर, काकडी ३१३ हेक्टर, मिरची ४७९ हेक्टर अशी लागवड झाली आणि १,८७७ हेक्टर वाल, ९२० हेक्टर मूग, ६७१ हेक्टर चवळी, ५६७ हेक्टर तूर आणि १,११६ हेक्टरवर हरभरा अशी लागवड झाली.