ठाणे : मुंब्रा येथील शंकर मंदिर, डॉ. आंबेडकर नगर, शिवाजी नगर, अमृत नगर या परिसरात ठामपाकडून दिवसांतून अवघे दोनच तास पाणी मिळते. अशात कालपासून दूषित पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रांतर्गत विविध भागात जलवाहिन्या फुटलेल्या असून जलवाहिन्यांची दुरुस्ती होत असताना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे तर काही ठिकाणी नळाद्वारे अति दूषित पाणी येत आहे. मुंब्रा भागात दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना पोटाचे विकार सुरू झाले आहेत.
महापालिकेने दूषित पाण्याबाबत आणि पाण्याच्या वापराबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. काही दिवस पाणी उकळून व गाळून पिण्यासंबंधी नागरिकांना जाहीर आवाहन करत योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे. पाण्याचा रंग आणि चव बदलली असल्यास नमुने घेऊन त्याची चाचणी होणे गरजेचे आहे. ही बाब मागील आठवड्यातच ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आयुक्तांना पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर देखील महापालिकेकडून मुंब्र्यात दूषित पाणीपुरवठा सुरूच आहे.