डोंबिवलीत उद्धव ठाकरे समर्थकांचे नववर्षाचे शुभेच्छा फलक फाडले

डोंबिवली : शहरातील मानपाडा रस्त्यावर शिवसनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त लावलेले शुभेच्छांचे फलक रविवारी रात्री काही अनोळखी इसमांनी फाडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त डोंबिवली शहराच्या विविध भागात राजकीय नेत्यांनी शुभेच्छा देणारे फलक लावले आहेत. या फलकामंध्ये मानपाडा रस्त्यावर शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख विवेक खामकर, महिला आघाडीच्या पदाधिकारी कविता गावंड यांचेही फलक लावण्यात आले होते. चैत्रपाडवा संपला तरी शहरातील राजकीय नेत्यांच्या छब्या असलेल्या फलक, कमानी अद्याप कल्याण डोंबिवली महापालिका आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वत:हून काढले नाहीत. याविषयी नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पालिका कामगार गल्लीबोळातून शहर विद्रूप करणारे किरकोळ फलक काढून कारवाईचा मोठा देखावा निर्माण करत आहेत.

या फलकांवरुन नागरिकांमध्ये चर्चा सुरू असतानाच रविवारी रात्री काही अज्ञात व्यक्तिंनी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समर्थकांना लक्ष्य करुन त्यांचे मानपाडा रस्त्यावर ढापरे इमारतीसमोर लावण्यात आलेले शुभेच्छांचे फलक फाडून टाकण्यात आले. सकाळी हा प्रकार निदर्शनास आल्यावर कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष सदानंद थरवळ, माजी आ. सुभाष भोईर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. शहरप्रमुख विवेक खामकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात फलक फाडणाऱ्या अज्ञात व्यक्तिंविरुध्द तक्रार केली. पोलिसांनी अदखपात्र गुन्हा दाखल करुन घेतला आहे. मानपाडा रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी फलक फाडणाऱ्यांना अटक करण्याची मागणी ठाकरे समर्थकांनी केली आहे.