ठाणे : कांदळवनामुळे जमिन नापिक होणाऱ्या शेतकऱ्यांना सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे टीडीआर देण्याची मागणी माजिवडे-मानपाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. सरनाईक यांनी लक्ष्यवेधी सूचना मांडून सभागृहाचे लक्ष्य वेधून घेतले. कांदळवनामुळे माजिवडे-मानपाडा मतदार संघातील अनेक विकासकामात अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार कामाची परवानगी घ्यावी लागते, परंतु खाडीकिनारी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मात्र कांदळ वृक्षाच्या बिया पाण्याबरोबर शेतात आल्याने शेत नापिक होत असल्याची समस्या आ. सरनाईक यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्यांप्रमाणे टीडीआर देण्याची मागणी केली.
घोडबंदर येथील मेट्रोच्या कोस्टल रोड, घोडबंदर किल्ल्याशेजारी शिवसृष्टी उभारणे, जेसलपार्क चौपाटी उभारणे, नागला आणि घोडबंदर खाडी किनारा विकसित करणे, सुभाषचंद्र बोस मैदान विकसित करणे आणि घोडबंदर येथे जेट्टी उभारण्याच्या कामात कांदळवन नियंत्रण नियमामुळे फार अडचणी निर्माण होत असल्याचे आ. सरनाईक यांनी वनमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत.
या लक्ष्यवेधीवर उत्तर देताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की शेतकऱ्यांना टीडीआर देण्यासाठीचा प्रस्ताव वन विभागाकडे आलेला नाही. इतर विकास कामांच्या सद्यस्थितीबाबतची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.