नवी मुंबई : भाज्यांची आवक घटल्याने वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. अवकाळी पावसाने भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. घाऊक बाजारात टोमॅटोचे दर स्थिर असून हिरवी मिरची, शिमला मिरची, काकडी, गवार, भेंडी, वाटाण्याचे दर वाढले आहेत.
दरवर्षी हिवाळ्यात डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात हिरवा वाटाणा दाखल होत असतो, त्यामुळे दरात घसरण होते. परंतु आता हिरव्या वाटाण्याचा हंगाम संपुष्टात आला असून कमी प्रमाणात वाटाणा बाजारात दाखल होत आहे. गुरुवारी घाऊक बाजारात ११९८ क्विंटल आवक झाली आहे. एपीएमसीत हिरवा वाटाणा आधी प्रतिकिलो २८-४० रुपयांनी उपलब्ध होता, तो आता ४०-६५ रुपयांनी विक्री होत आहे.
एपीएमसी बाजारात दररोज ६०० ते ६५० गाड्या आवक होते, गुरुवारी बाजारात ५५५ गाड्या दाखल झाल्या आहेत. टोमॅटो स्वस्त असून इतर भाज्यांची दरवाढ झाली आहे. वाटाणा, शिमला मिरची, गवार, भेंडी, काकडीच्या दरात अधिक वाढ झाली आहे. आधी घाऊक बाजारात भेंडी ४४ रुपयांवरून ५० रुपये, गवार ७०-७५ रुपयांनी उपलब्ध होती ती आता ८० रुपये, हिरवी मिरची ४८-५० रुपयांवरून ६० रुपये, शिमला मिरची ३६ रुपयांवरून ४२ रुपयांनी विक्री होत आहे.
आता आधी
हिरवी मिरची ६० ४८-५०
शिमला ४२ ३६
काकडी २४ १६
भेंडी ५० ४४
गवार ८० ७०-७५
वाटाणा ४०-६५ २८-४०