नेवाळीमध्ये दोन चिमुकल्यांचा पाण्यात बुडून मृत्यू

उल्हासनगर: उल्हासनगर शहरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्याच्या खड्डयात बुडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडल्याने विभागात शोककळा पसरली आहे.

हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाकाजवळील डावलपाडा विभागात काही दिवसांपूर्वी एमआयडीसीच्या अंतर्गत ठेकेदाराने जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू केले होते. त्यावेळी त्याठिकाणी एक खड्डा खोदला होता. त्यात जलवाहिनीतील पाणी त्या खड्ड्यात सोडण्यात आले होते. काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास परीसरात राहणारे दोन चिमुरडे सनी यादव (८) आणि सुरज राजभर (६) हे त्या ठिकाणी खेळत होते. त्यावेळी त्या दोघांचा पाण्यात बुडून मुत्यु झाला.

त्या बेजबाबदार ठेकेदारावर त्वरित गुंन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे. जोपर्यंत ठेकेदारांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंतिम संस्कार करण्यात येणार नसल्याचा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे हे करत आहेत. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.