ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांची संपातून माघार?
ठाणे : जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यावरून एकीकडे राज्यातील शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संपावर गेले असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मात्र ठाणे महापालिकेच्या कारभारावर कोणताच परिणाम झाला नसल्याचे उघड झाले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातीलच कर्मचारी संपावर गेले असल्याने ठाणे महापालिकेचेही कर्मचारी संपावर जातील अशी अपेक्षा असताना प्रत्यक्ष संपात सहभागी न होता केवळ निदर्शने करून पालिकेचे कमर्चारी माघार घेताना दिसले. संप असतानाही पालिकेचा कारभार सुरळीत कसा? या प्रश्नावर मात्र एकही कर्मचारी बोलायला तयार नाही.
जुन्या पेन्शन योजनेसह इतर काही मागण्यांसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला संपाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली होती. यानंतर शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी संघटनांनी संपावर जाण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांविरोधात कायद्याचा बडगा उगारला आहे. संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा राज्य सरकारने दिला आहे. असे असले तरी शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी आक्रमक होऊन संपाचे हत्यार उपसले आहे.
पेन्शन योजनेबाबत तोडगा काढला जाईल, मात्र संपावर जाऊ नये असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच केले आहे. राज्यातील कर्मचाऱ्यांवर या आवाहनाचा फारसा परिणाम जाणवला नसला तरी मुख्यमंत्र्यांचा दबदबा असलेल्या ठाण्यात मात्र ठाणे महापालिकेचे कर्मचारी प्रत्यक्षात संपामध्ये सामील झाले नसल्याचे पाहायला मिळाले. संपाऐवजी केवळ निदर्शने करून आयुक्तांना मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे ठाणे म्युन्सिपल युनियन कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ठाणे महापालिकेतील कर्मचारी मात्र संपात सहभागी झाले नसले तरी कोणते कर्मचारी गैरहजर आहेत आणि ते कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत का याची माहिती घेण्याचे काम ठाणे महापालिका प्रशासनाकडून सुरू होते.