आमदार संजय केळकर यांची लक्षवेधी
ठाणे : पुरेसे पाणी देणारी व्यवस्था नसताना ठाणे महापालिकेने बहुमजली इमारतींच्या बांधकामांना मंजुऱ्या दिल्या आहेत. आधीच पाण्याचा तुटवडा असताना या नवीन हजारो रहिवाशांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न उपस्थित करत आमदार संजय केळकर यांनी ठाणेकर रहिवाशांची कोट्यवधींची लूट करणाऱ्या टँकर लॉबीविरोधात कारवाईची मागणी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार संजय केळकर यांनी लक्षवेधी मांडत ठाण्यातील पाणीटंचाईबाबत प्रश्न उपस्थित केले. पाण्याची टंचाई असताना महापालिका नवीन बांधकामांना परवानग्या देत असल्याने उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. यावर न्यायालयाने पुरेसे पाणी पुरवता येत नसेल तर नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. तर ठाणे महापालिकेने पुरेसा पाणी पुरवठा करू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. मात्र तरीही ठाणे शहरातील अनेक भागात पाणी टंचाई असूनही पालिका बहुमजली इमारतींना परवानगी देत असल्याचे श्री.केळकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. ही नवीन बांधकामे बंद करणार का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ठाणे शहरात ५० मजल्यांच्या १५ आणि एक ७२ मजली इमारतीला परवानगी दिली आहे. आधीच पाणी टंचाई असताना या इमारंतींमधील हजारो नागरीकांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न आ.केळकर यांनी उपस्थित केला.
कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात जादा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. मात्र घोडबंदर भागात अनेक गृहसंकुलांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या भागाला अतिरिक्त ५० एमएलडी पाणी पुरवठा मंजूर करण्यात आला आहे. त्याची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे किमान १० एमएलडी पाणी पुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी श्री.केळकर यांनी केली.
शहरातील पाणी टंचाईचा फायदा टँकर लॉबी उचलत असून त्या माध्यमातून कोट्यवधींची लूट सुरू असल्याचे श्री.केळकर यांनी निदर्शनास आणले आहे. महापालिका ७०० रुपये प्रति टँकर पाणी पुरवठा करते. हेच पाणी टँकर लॉबी विकत घेऊन ठाणेकरांना चार ते पाच हजार रुपये दराने विकून मोठी लूट करत असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला. या टँकर लॉबीविरोधात कारवाई करणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शहरातील संबंधित आमदारांची संयुक्त बैठक मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले. सध्या ठाणे शहराला स्वतःच्या योजनेतून २५० एमएलडी, स्टेमकडून ११५ एमएलडी, एमआयडीसीकडून १३५ एमएलडी तर मुंबई महापालिकेकडून १८५ एमएलडी पाणी मिळते. बैठकीत पाणी टंचाईवर तोडगा काढण्यात येईल, असेही श्री.सामंत यांनी स्पष्ट केले.
शाई-काळू धरण प्रत्यक्षात आणा-सरनाईक
ठाणे शहरात दिवसेंदिवस शहरीकरण होत असल्याने शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचा गैरफायदा घेऊन टँकर लॉबीने ठाणे शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून विविध सोसायट्यांना टँकरद्वारे पाणी घेण्यास भाग पाडल्याचे कारस्थान उघडकीस आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील घोडबंदर, वागळे इस्टेट, समतानगर, वर्तकनगर, सिध्देश्वर, जेल, तलाव, आदी भागात पाणी पुरवठा होत नसल्याने तेथील सोसायट्यांना नाईलाजास्तव जास्त भावाने टँकरचे पाणी मागवावे लागत आहे. या गैरप्रकारात टँकर लॉबीबरोबर पाणी पुरवठ्याचे कार्यकारी व उप अभियंता यांचा सहभाग आहे काय, असा प्रश्न नागरिक विचारात आहेत. ठाणे शहरातील शाई व काळू धरण प्रकल्प प्रत्यक्षात आणून नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करण्यास तसेच ठाणे शहरातून टँकर लॉबीचे उच्चाटन करावे अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्ष्यवेधीच्या चर्चेत केली.