वातानुकूलित बसचे भाडे कमी करण्याचा ठामपाचा निर्णय
ठाणे : इतर परिवहन सेवेच्या तुलनेत जास्त प्रवासी भाडे आकारणाऱ्या ठाणे परिवहन सेवेला अखेर उशिराने शहाणपण सुचले आहे. ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात असलेल्या वातानुकूलित बसेसचे प्रवास भाडे कमी करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे.
बोरिवली मार्गावर धावणाऱ्या ठाणे परिवहनच्या बसचे प्रवासी भाडे हे २ किमीसाठी २० रुपये इतके आकारले जात होते. त्या तुलनेत बेस्टचे सहा रुपये तर एनएमएमटीकडून १० रुपये आकारले जात होते. अखेर ठाणे परिवहनची प्रवासी संख्या वाढवण्यासाठी ठाणे महापालिकेला दर कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे.
ठाणे परिवहन सेवेतर्फे व्होल्व्हो वातानुकूलित बससेवा बोरीवली मार्गावर सुरू आहे. सुरूवातीच्या प्रवासापासून दोन किलोमीटरपर्यंत परिवहनच्या व्होल्व्हो बसचे भाडे हे 20 रुपये इतके आकारले जात होते. तर याच मार्गावर बेस्टचे भाडे सहा रुपये तर एनएमएमटीचे भाडे 10 रुपये इतके आकारले जात होते. परिणामी या मार्गावर बेस्ट आणि एनएमएमटीच्या तुलनेत ठाणे परिवहन सेवेकडे प्रवासी संख्या ही कमी होती. ही प्रवासी संख्या वाढावी यासाठी प्रवासी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन दराप्रमाणे दोन किलोमीटरसाठी 10 याप्रमाणे प्रत्येक दोन किलोमीटरमागे प्रवासभाड्यात कपात करुन 40 किलोमीटरच्या प्रवासासाठी यापूर्वी 105 रुपये मोजावे लागत होते, परंतु नवीन दरानुसार हेच भाडे 65 रुपये इतके आकारले जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास कमी दरामध्ये सुखकर होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया आयुक्त बांगर यांनी दिली आहे.
परिवहनच्या ताफ्यात १२३ बसेस दाखल होणार
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात येणार आहेत, यामध्ये आगामी काळात 123 बसेस परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल होणार असून 45 स्टॅण्डर्ड बसेस व 16 मिडी बसेस अशा एकूण 71 वातानुकूलित बसेस तसेच 10 स्टॅण्डर्ड बसेस व 42 मिडी बसेस अशा एकूण 52 सर्वसाधारण बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. वातानुकूलित 26 मिडी बसेस व शहरातंर्गत उर्वरित 45 स्टॅण्डर्ड बसेस ठाणे शहराबाहेर दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर उदा. घाटकोपर, नवी मुंबई, पनवेल आदी मार्गावर चालविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त बांगर यांनी स्पष्ट केले आहे.