राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची अधिवेशनात प्रशासनावर टीका
ठाणे: ठाणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून दिवसाढवळ्या खून-मारामाऱ्या होत असून पहाटे सहा वाजेपर्यंत बार आणि हुक्का पार्लर सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत निदर्शनास आणून दिले तसेच यात वेळीच लक्ष घालण्याची मागणीही त्यांनी केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आ. आव्हाड यांनी ठाण्यात दोन दिवसांपूर्वी झालेला खून तसेच उल्हासनगर येथे वृद्धाचा पोलिस ठाण्यात झालेला मृत्यू आणि काल रात्री एका गुंडाने केलेल्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाण्यात येऊर हे ठिकाण इको सेन्सेटिव्ही झोन असतानाही या भागातील बार हॉटेल हुक्का पार्लर पहाटे सहा वाजेपर्यंत खुली असतात. येथे सर्रास दारूची पहाटेपर्यंत विक्री होत असल्याने तरुण पिढी दारू पीत बसलेली असते. तसेच हुक्का पार्लरला बंदी असतानाही ते सर्रास सुरू असतात, त्यामुळे सुसंस्कृत ठाण्याची ओळख पुसली जात आहे. गुंडांना बंदुकीचे परवाने दिले जात आहेत, येथील नागरिक सुरक्षित नाहीत. कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली वशिल्याने आलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला काम करावे लागत आहे, त्यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होत असल्याचे आ. आव्हाड यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
एके काळी सुसंस्कृत शहर अशी ठाण्याची ओळख होती, परंतु त्याची दरी फार मोठी झाली असल्याची खंत आ. आव्हाड यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री यांचे ठाणे असल्याने त्यांनी वेळीच ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
ठाण्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर, लेडीज बारमुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत चालली असून या विरोधात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी ठाण्यात लोकचळवळ उभी केली आहे. मागील हिवाळी अधिवेशनात त्यांनी याकडे सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्यानंतरही अद्याप हे धंदे सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.