डोंबिवली : कल्याणच्या रिंगरोड परिसरात दुर्मिळ शिंगाळा घुबड आढळले असतानाच आता डोंबिवली भोपर गावात दक्षिण आफ्रिकेतील दुर्मिळ रणगोजा म्हणजेच डेझर्ट व्हिटीअर पक्षी आढळून आला आहे. पक्षी निरीक्षक आणि आहारतज्ञ डॉ. महेश पाटील यांनी या देखण्या पक्षाला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.
डॉ. महेश पाटील भोपर गावात फेरफटका मारत होते. त्यावेळी त्यांच्या निदर्शनास हा दुर्मिळ पक्षी दिसला. अतिशय चपळ असणाऱ्या या रणगोजा पक्षाचे दक्षिण आफ्रिकेचे सुप्रसिद्ध सहारा वाळवंट मूळ निवासस्थान. या ठिकाणाहून हा रणगोजा पक्षी तब्बल पाच हजार किलोमीटरचे अंतर कापून डोंबिवलीमध्ये आला आहे. त्याचा आकार आणि रंग हा आपल्याकडील चिमणीप्रमाणेच आहे. दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत हा चिमुकला मात्र तितकाच कणखर पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून भारतात दाखल होत असल्याची माहिती पक्षी निरीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिली. मार्च अखेरीपर्यंत रणगोजाचा आपल्याकडे मुक्काम असतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा हा पक्षी आपल्या मूळ ठिकाणच्या दिशेने रवाना होतो असे डॉ. महेश पाटील यांनी सांगितले.