ठाणे : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबातील सदस्याची सुपारी दिल्याच्या क्लिपमुळे वादात अडकलेल्या स्थावर मालमत्ता विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्याकडील पदभार अखेर काढण्यात आला आहे.
मागील आठवड्यात क्लिपमुळे वादात अडकलेल्या महेश आहेर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती तर श्री. आहेर यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. महापालिका भवनासमोर ऋता आव्हाड यांनी आंदोलन देखील केले होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असा दबाव वाढल्याने आज अखेर अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी श्री. आहेर यांच्याकडील पदभार काढून तो लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त अक्षय गुडघे यांच्याकडे सोपवण्यात आल्याचे आदेश काढले आहेत.