ठाणे: ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्ताचे निलंबन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करत पक्ष कार्यालय ते ठाणे महापालिका भवनपर्यंत मोर्चा काढला.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची एक ध्वनिफीत चार दिवसांपूर्वी प्रसारित झाली असून या ध्वनिफितीमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला होता. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांच्यावर हल्ला केला होता. धमकी प्रकरणी आमदार आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेत आहेर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. तसेच सर्व पुरावे देऊनही कारवाई होत नसल्याचा आरोप करत आ.आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी नाराजी व्यक्त केली होती.
काँग्रेसनेही धमकीप्रकरणाची चौकशी करून आहेर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यापाठोपाठ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिका मुख्याल्यासमोर आंदोलन केले. महेश आहेर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ऋता आव्हाड या सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
अटकेतील चारही आरोपीना न्यायालयीन कोठडी
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना मारहाण प्रकरणी अटकेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चारही पदाधिकाऱ्यांना सोमवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आहेर यांना काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ मारहाण केली होती. या मारहाणप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरोधात हत्येचा प्रयत्न, लोकसेवकाला मारहाण, शस्त्रास्त्र कायदा कलमांतर्गत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.