ठाणे : सहाय्यक आयुक्त मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांना ठाण्याच्या न्यायालयाने २७ फेब्रुवारीपर्यंत अंतरिम जमीन मंजूर केला आहे तर चार अटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिस कोठडी तीन दिवसांनी वाढविण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना दोन दिवसांपूर्वी मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. त्या गुन्ह्यात आ.आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याबाबत ठाण्याच्या न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळविण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता, तो मंजूर करण्यात आला असून २७ फेब्रुवारीपर्यंत अटक करण्यास पोलिसांना मनाई करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या चार कार्यकर्त्यांची पोलीस कोठडी मात्र आणखी तीन दिवस वाढविण्यात आली आहे.
दरम्यान आज आ. आव्हाड आणि त्यांची मुलगी नताशा यांनी पत्रकार परिषदेत ठाणे पोलिसांच्या विरोधात गंभीर आरोप केले आहेत. श्री. आहेर यांच्या विरोधात अजूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. आम्हाला पोलिस संरक्षण अजूनही दिले नाही. आम्ही भीतीने घराच्या बाहेर पडत नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षण देण्याचे मान्य केले होते, परंतु अजूनही त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.