परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
ठाणे: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता २४ फेब्रुवारीला त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
एसटी महामंडळाकडे निधीअभावी थकीत वेतन देणे कठीण झाले असताना शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली. परिणामी, फेब्रुवारी महिन्याच्या थकीत वेतनवाढीचा हप्ता कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाला. हा केवळ आर्थिक दिलासा नसून, तो शासनाच्या संवेदनशीलतेचा आणि बांधिलकीचा प्रत्यय आहे. असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहमतीने कामगार संघटनांच्या बैठकीत दरमहा सुमारे ६५ कोटी रुपयांचे अनुदान देण्याचे घोषित केले होते. त्यानुसार डिसेंबरपासून थकीत हप्त्यांची प्रक्रिया सुरू झाली. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारीत निधीअभावी हप्ता देणे अशक्य झाले आणि कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची लाट उसळली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मंत्री सरनाईक यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने चर्चा करत २१० कोटी रुपयांची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि त्यापैकी १०० कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध झाला. उर्वरित रक्कमही लवकरच प्राप्त होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.