डोंबिवली: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नियंंत्रणाखालील खासगी तत्वावरील कचरा वाहू डम्परखाली येऊन डोंबिवलीतील एका शिक्षकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना ८२ लाखांची भरपाई देण्याचे आदेश मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने दिले आहेत.
डी. एन. सी. शाळेतील शिक्षक प्रभाकर जीवराम ठोके (५५) यांचा दुचाकीवरून प्रवास करताना सात वर्षापूर्वी घरडा सर्कल चौक येथे मृत्यू झाला होता. याप्रकरणात मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाच्या सदस्या रूपाली मोहिते यांनी या शिक्षकाच्या वारसांना ८२ लाख ४५ हजार १५३ रूपये भरपाई देण्याचे आदेश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि कचरा वाहू डम्परची विमा कंपनी यांना दिले. संयुक्तपणे ही भरपाई कडोंमपा आणि डम्परची विमा कंपनी न्यु इंडिया ॲश्युरन्स कंपनी यांनी द्यायची आहे.
कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नियंत्रणाखाली खासगी तत्वावर काम करत असलेल्या मे. विशाल एक्सपर्ट सर्व्हिसेस एजन्सीच्या कचरा वाहू डम्परवर खासगी चालक काम करत होता. त्याच्या निष्काळजीपणातून हा अपघात झाला होता. त्यामुळे तो चालक आमचा नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने न्यायाधिकरणासमोर केला. पण न्यायाधिकरणाने कडोंमपाच्या नियंत्रणाखाली डम्पर चालक काम करत असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये डम्पर चालकाचा ८५ टक्के दोष असल्याचे मत नोंदवत पालिका आपली जबाबदारी झटकू शकत नसल्याचे स्पष्ट केले.
प्रभाकर ठोके हे डोंबिवली सुनीलनगरमधील डी. एन. सी. शाळेत साहाय्यक शिक्षक होते. ते दररोज आपल्या दुचाकी वाहनाने शाळेत येत होते. ३ डिसेंबर २०१९ रोजी ठोके आपल्या दुचाकीने डोंबिवलीत सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान येत होते. डोंबिवली शहराच्या प्रवेशव्दारावरील घारडा सर्कल येथून येत असताना बेदरकारपणे डम्पर चालविणाऱ्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या कचरा वाहू वाहनाखाली ते आले. त्यांचा चिरडून जागीच मृत्य झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ठोके यांना दरमहा ९८ हजार ३३२ रूपये पगार होता.
या मृत्युप्रकरणी भरपाई मिळण्यासाठी ठोके यांच्या पत्नी, तीन मुले आणि वृध्द आई यांनी मोटार अपघात न्यायाधिकरणासमोर दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणाने ठोके यांचा नोकरीतील सेवाकाळ आणि या कालावधीत त्यांना मिळणारे ८३ लाख वेतन आणि इतर मानसिक, शारीरिक नुकसान विचारात घेता ९७ लाख नुकसान झाल्याचे मूल्यांकन न्यायाधिकरणाने केले होते. यामध्ये काही प्रमाणात मयत शिक्षकाचा हलगर्जीपणा असल्याचे मत व्यक्त करत न्यायाधिकरणाने दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून नऊ टक्के व्याजाने ८२ लाख ४५ हजार रूपये मयत शिक्षक प्रभाकर ठोके यांच्या वारसांना संयुक्तपणे देण्याचे निर्देश कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन आणि डम्परच्या वाहन मालकांना दिले.