ठाण्यात सेना-भाजपचा ८१-४५चा फॉर्म्युला?

* मित्र पक्षांना पाच जागा
* उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची पहाटेपर्यंत चर्चा

ठाणे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यात ठाण्यातील श्री.शिंदे यांच्या निवासस्थानी पहाटेपर्यंत झालेल्या बैठकीत जागा वाटपाबाबत दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत शिवसेनेला ८१ तर भाजपाला ४५ जागा असा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात आहे. तर मित्र पक्षांना पाच जागा देण्यात येणार असल्याचे कळते.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्वबळाचे नारे आणि प्रवेश सोहळे होत असल्याने शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये गेल्या काही दिवसांत तणाव होता. युती नको म्हणून ठाण्यातील भाजपच्या सर्व मंडल अध्यक्षांनी राजीनामे प्रदेशाध्यक्षांकडे दिले होते. मात्र ते न स्वीकारता त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आल्याने हा तणाव कमी झाला आहे. तर नुकताच भाजपकडून वरिष्ठांना ५५ जागांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी सेना भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के, सरचिटणीस राहुल शेवाळे हे देखील उपस्थित होते. यावेळी झालेल्या निर्णयानुसार शिवसेना शिंदे गटाला ८१, भाजपला ४५ आणि मित्रपक्ष असलेल्या आनंदराज आंबेडकर आणि रामदास आठवले यांच्या पक्षांना पाच जागा देण्यात येणार असल्याचे कळते.

दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापलिका निवडणुकीत देखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार मुंबई ठाणे, कल्याण-डोंबिवली आदी महापालिकांमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजप युती अंतिम टप्प्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे बोलले जात असले तरी खात्रीलायक ५५ जागांची मागणी करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे समाधान होईल, असे दिसत नाही. त्यामुळे सध्यातरी जागावाटपाचा प्रश्न संपलेला नसल्याचे दिसत आहे.

याबाबत खासदार नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की शिवसेना-भाजपा युती होण्यात कोणत्याही प्रकारची अडचण नाही. कोणत्या पक्षाला किती जागा सोडल्या या बाबतची माहिती युतीचे वरिष्ठ नेते देतील, परंतु युती मात्र १०० टक्के होणार असल्याचा खा. श्री म्हस्के यांनी दावा केला.

भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार निरंजन डावखरे यांनी युती होणार असल्याचा पुनरुच्चार केला. कुणाला किती जागा देण्यात येणार याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी ठाणे महापालिकेत भाजप-शिवसेना महायुतीचा महापौर बसणार यात वाद नाही, अशी प्रतिक्रिया श्री.डावखरे यांनी दिली.