* मलनिःस्सारण आणि पाणी समस्यांची तड लागणार
* नगरसेवक सीताराम राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत पाहणी
ठाणे: शिवाई नगरमधील सुमारे ७८ सोसायट्या आणि परिसरात गेले अनेक महिने कमी दाबामुळे पाणीटंचाई भेडसावत असून येत्या सहा महिन्यांत ही समस्या दूर होण्याची चिन्हे आहेत. स्थानिक नगरसेवक सीताराम राणे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसमवेत प्रभाग ५ मध्ये पाहणी करून अधिकाऱ्यांना निर्देश दिले. नवीन पंपिंग स्टेशन उभारण्याचे काम सुरू असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची शक्यता असल्याने या भागातील पाणी टंचाई संपणार असल्याचे बोलले जात आहे.
ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक ५ मधील अपुरा पाणीपुरवठा, घनकचरा, मलनि:स्सारण समस्यांसह अपघात प्रवण रस्त्यावर गतीरोधक उभारण्याच्या कार्यवाहीची गांभीर्याने दखल घेत भारतीय जनता पार्टीचे स्थानिक नगरसेवक सीताराम राणे यांनी बुधवारी थेट मनपा प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांसोबत जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी शेकडो रहिवासी उपस्थित होते.
नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर ही पाहणी करण्यात आली असून लवकरच यावर तातडीची उपाययोजना करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील प्रभाग क्रमांक ५ मधील शिवाईनगर परिसरात गेले काही दिवस अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. मध्यरात्री १२ नंतर अवघ्या अर्ध्या तासापेक्षा कमी कालावधीसाठी पाणी पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. दर बुधवारी होणाऱ्या शटडाऊननंतर तर पुढील दोन दिवस पाण्याचा दाब आणखी कमी होत असल्याने रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. शिवाईनगरमध्ये एकूण ७८ सोसायट्या असून सर्वच सोसायट्यांमधील नागरिकांनी नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. यावर नगरसेवक सीताराम राणे यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देत, किमान एक तास तरी उच्च दाबाने पाणीपुरवठा करावा, “एकदाच पाणी द्या पण उच्च दाबाने पुरवा,” अशी ठाम भूमिका सीताराम राणे यांनी मांडली. पाणीपुरवठ्याबाबत कोणतीही हलगर्जीपणा न करता तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना देऊन नागरिकांना नियमित, पुरेशा दाबाने आणि नियोजित वेळेत पाणीपुरवठा व्हावा यासाठी पाठपुरावा सुरूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पाणी पुरवठ्याच्या या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन संप (पंपिंग स्टेशन) उभारण्याचे काम सुरू असून येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तसेच ८०० दशलक्ष लिटर क्षमतेचा स्वतंत्र इनलेट सुरू करण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. हे काम मार्गी लागल्यानंतर शिवाईनगर आणि उपवन या दोन्ही परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवाईनगर भागातील घनकचरा आणि मलनि:स्सारण समस्यांचीही यावेळी प्रत्यक्ष पाहणी करून उपाययोजना करण्यात येणार आहेत. तर, गजानन महाराज मठ येथील रस्त्यावर गतीरोधक टाकण्यासाठी कार्यवाही सुरू केल्याचे सीताराम राणे यांनी स्पष्ट केले. या पाहणी दौऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रणधीर राणे, उपअभियंता गायकवाड, पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता भोये, मलनिःस्सारण विभागाचे उपअभियंता सजनानी आदी उपस्थित होते.
उपवन येथील जुन्या जलकुंभामुळे समस्या
उपवन परिसरातील पाण्याची टाकी (जलकुंभ) ही सन १९८४-८५ मधील असून तिची क्षमता केवळ दोन लाख लिटर आहे. ही टाकी संपूर्ण भरायला तब्बल ७ ते ८ तास लागतात. दिवसातून तीन वेळा टाकी भरावी लागते. त्यामुळे कमी दाब आणि अपुरा पाणीपुरवठा ही समस्या अधिक तीव्र होत असल्याचे निदर्शनास आले आहे. उप अभियंता भोये यांनीही याला दुजोरा देत या जलकुंभातून शिवाईनगर भागाला अडीच एमएलडी पाणीपुरवठा केला जात असल्याचे सांगितले. मात्र वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत पाणी पुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी कबूल केले.