ठाण्याच्या स्वागत यात्रेत 75 चित्ररथ

ठाणे : दरवर्षीप्रमाणे श्री कौपीनेश्वर मंदिर न्यासाच्या पारंपारिक प्रथेनुसार ठिक सकाळी सात वाजता भव्यदिव्य स्वागत यात्रा काढण्यात आली. समर्थ भारत ..श्रेष्ठ भारत, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष’ या संकल्पनेवर आधारीत स्वागत यात्रा होती. या यात्रेत ७५ चित्ररथ सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रतिवर्षानुसार स्वागतयात्रेत पहिल्यापासून सहभागी झाले होते. यावर्षी स्वागताध्यक्ष म्हणून ज्युपिटर हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. विनोद इंगळहळीकर लाभले. त्यांच्यासह विशेष अतिथी म्हणून पद्मविभषण पंडिता डॉ. एन राजम (जगविख्यात व्हायोलिन वादक), आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी उपस्थित होते.

ठाणे शहरातून ही स्वागतयात्रा निघाली होती. कौपिनेश्वर मंदिरातून निघालेली मिरवणूक तलावपाळी मार्गे चरई, तीन पेट्रोल पंपमार्गे हरिनिवास, नौपाडा, राममारुती रोड रस्तामार्गे गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली. या स्वागत यात्रांमध्ये शहरातील विविध प्रकारच्या संस्था, ठाणें महानगरपालिका, ठाणें जनता सहकारी बँक, सनातन संस्था, समर्थ भारत व्यासपीठ,सरस्वती शाळा, रोटरी, समतोल फाउंडेशन, वकील संघटना, पर्यावरण दक्षता मंच, व इतर संस्था, संघटना यावेळी सहभागी झाल्या होत्या.

खासदार राजन विचारे यांनी नौपाडा परिसरात पुष्पवृष्टी करत शोभायात्रेचे स्वागत केले. दरवर्षासारखी स्वागतयात्रा पाहण्यासाठी तोबा गर्दी केली होती. महिलांची पारंपरिक वेशभषेतील बुलेट रॅली आणि गुढी असलेल्या बाईक या यात्रेचे आकर्षण केंद्र ठरले.