ठाणेकर विनोद धारप यांना ब्राँझ पदक
ठाणे : नुकत्याच गोवा येथे पार पडलेल्या ४५व्या इंडीयन मास्टर्स वेटरनस नॅशनल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाणेकर विनोद धारप यांनी आपल्या दिमाखदार खेळाची छाप सोडत पदकास गवसणी घातली आहे.
दरवर्षी सातत्याने सराव व मेहनत करीत असणारे श्री. धारप हे ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे सर्वात जुने आणि उत्साही खेळाडू आहेत. वयाच्या ७३व्या वर्षी देखील जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रचंड मेहनत या जोरावर आपण यशाची नविन शिखरे गाठू शकतो याचे श्री. धारप हे मूर्तीमंत उदाहरण आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन प्रशिक्षण योजनेचे आणि तसेच ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनमध्ये देखील सहभाग असणारे श्री. धारप हे ठाण्यात बॅडमिंटनच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमांमध्ये योग्य ती भूमिका बजावत असतात आणि सोबत आपल्या बॅडमिंटनचा सराव देखील प्रामाणिकपणे करीत असतात. या आधी देखील त्यांनी स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे नेतृत्व करीत पदक जिंकले होते. गोवा येथे झालेल्या ४५व्या मास्टर्स नॅशनल अजिंक्यपद स्पर्धेत भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग होता. सुमारे १० वेगवेगळ्या वयोगटांत खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत सुमारे ५०० पेक्षा अधिक खेळाडू अजिंक्यपदासाठी झुंज देत होते. ७० वर्षांमधील वयोगटात श्री. धारप यांनी मिश्र दुहेरीच्या गटात नंदिनी नागराजन यांच्यासोबत सहभाग घेतला होता.
सुरुवातीचे सामने सहज जिंकून त्यांनी उप-उपांत्य फेरीत धडक मारली. उप-उपांत्य लढतीत त्यांचा सामना राजस्थान च्या राकेश शर्मा आणि महाराष्ट्राच्या विजयालक्ष्मी गुडीपुडी या बलाढ्य जोडीसोबत झाला. विनोद धारप यांनी आपल्या दिमाखदार खेळीने २१-१४, २१-१५ असा त्यांचा पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. परंतु उपांत्य फेरीत त्यांना हुबेर्ट फ्रान्सिस व जेस्सी फिलिप या अतिबलाढ्य जोडीकडून प्रभाव स्वीकारावा लागला आणि कांस्य पदकावर समाधानी व्हावे लागले .
सदर विजयात आपल्यावर ठाणे अकॅडमीचे सर्व प्रशिक्षक वेळोवेळी जी मेहनत घेत आहेत आणि मार्गदर्शन करीत आहे त्याचा सिंहाचा वाट आह असे विनोद धारप यांनी नमूद केले आहे.
जर तुमच्यात जिद्द असेल तर वय हे केवळ मोजमाप ठरते, हे धारपांनी सिद्ध करून दाखविले आहे असे योजनाप्रमुख श्रीकांत वाड यांनी व्यक्त केले. सदर कामगिरीसाठी सर्व टीमने श्री. धारप यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे.