ठाण्यातील ७३ रुग्णालयांचा कारभार अनधिकृत इमारतींमधून

* आग प्रतिबंधक उपाययोजना धाब्यावर
* रुग्णांच्या जीवाशी खेळ

ठाणे: गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या आगीची झळ अद्याप कमी झालेली नसताना ठाणे महापालिका क्षेत्रातील तब्बल ७३ खाजगी रुग्णालये अनधिकृत इमारतींमध्ये धोकादायक पद्धतीने कार्यरत असल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे अग्निसुरक्षेचे सर्व नियम पायदळी तूडवत ही रुग्णालये सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.

नगरसेवक सुरेश कांबळे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाला मुख्य अग्निशमन अधिकारी आणि वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरातून ही माहिती समोर आली आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सध्या ४२७ नोंदणीकृत खाजगी रुग्णालये आहेत. त्यापैकी जवळपास प्रत्येक पाचपैकी एक रुग्णालय अनधिकृत बांधकामात सुरू असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते.
रुग्णालयांमध्ये अग्नितांडवाच्या घटना घडल्यास सर्वाधिक फटका रुग्ण, ज्येष्ठ नागरिक आणि अतिदक्षता विभागातील रुग्णांना बसतो. अशा परिस्थितीत अनधिकृत इमारतींमध्ये सुरू असलेल्या रुग्णालयांची संख्या इतकी मोठी असणे चिंताजनक मानले जात आहे.

रुग्णालये ही सामान्य इमारतींसारखी नसतात. येथे अतिदक्षता विभागातील रुग्ण, व्हेंटिलेटरवरील रुग्ण, नवजात बालके, ज्येष्ठ नागरिक आणि शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत असलेले रुग्ण असतात. त्यामुळे कोणतीही आपत्ती उद्भवल्यास त्यांना तत्काळ बाहेर काढणे अत्यंत अवघड असते. अशा परिस्थितीत अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात अनेक रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचाच अभाव असल्याचे चित्र आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे अनेक लहान-मोठ्या रुग्णालयांमध्ये आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र ‘इमर्जन्सी एक्झिट’ नाही. अनेक ठिकाणी रुग्णालयात प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एकच जिना किंवा एकच दरवाजा आहे. आग लागल्यास धूर आणि ज्वाळांमुळे हा मार्ग बंद झाला तर रुग्णांना बाहेर काढणे अशक्य होऊ शकते.

राष्ट्रीय अग्निसुरक्षा निकषांनुसार बहुमजली रुग्णालयांमध्ये पर्यायी बाहेर पडण्याचा मार्ग, अग्निरोधक जिना आणि स्पष्ट दिशादर्शक फलक असणे आवश्यक आहे. याशिवाय अनेक रुग्णालयांमध्ये पार्किंग आणि तळमजल्याचा वापर मूळ परवानगीपेक्षा वेगळ्या कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी आहेत. काही ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडर, वैद्यकीय साहित्य किंवा इतर ज्वलनशील वस्तूंचा साठा करण्यात येतो. आग लागल्यास अशा वस्तूंमुळे दुर्घटनेची तीव्रता अनेक पटींनी वाढू शकते.

रुग्णालयांमधील आणखी एक गंभीर समस्या म्हणजे अरुंद प्रवेशमार्ग. अनेक हॉस्पिटल्स गर्दीच्या वसाहती किंवा अनधिकृत बांधकामांच्या समूहात आहेत. अशा ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दलाच्या मोठ्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचणेच कठीण होऊ शकते. गावदेवी दुर्घटनेदरम्यानही अरुंद रस्ते आणि अनियोजित बांधकामांमुळे बचावकार्यात अडचणी निर्माण झाल्याचे समोर आले होते. अग्निशमन तज्ज्ञांच्या मते, रुग्णालयांमध्ये केवळ फायर एक्स्टिंग्विशर लावणे पुरेसे नसते. फायर अलार्म प्रणाली, स्मोक डिटेक्टर, स्प्रिंकलर यंत्रणा, अग्निरोधक दरवाजे, धूर नियंत्रण व्यवस्था आणि नियमित मॉक ड्रिल अनिवार्य असतात. मात्र अनेक ठिकाणी या यंत्रणा बसविलेल्या असल्या तरी त्यांची देखभाल आणि कार्यक्षमता तपासली जात नसल्याचे आढळते.

१२ ऑगस्ट २०१४ रोजीच्या ठरावानंतर अनधिकृत बांधकामांमधील रुग्णालयांना नवीन नोंदणी देण्यात आलेली नसल्याचा दावा ठाणे महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र २०१८ नंतर अशा २३ रुग्णालयांची नोंदणी झाल्याचे आकडे सांगतात. त्यामुळे या नोंदणी कोणत्या नियमांच्या आधारे करण्यात आल्या, याचे उत्तर अद्याप अस्पष्ट आहे.