ठाणे : मोठ्या प्रमाणात हरवलेले मोबाईल आणि चोरीला गेलेल्या मोबाईल संचांच्या चोरीच्या तक्रारी ठाणे पोलीस उपायुक्त १ परिमंडळात नोंदवण्यात आल्या होत्या. त्याची गंभीर दखल परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी घेतल्यामुळे एकूण एक कोटी २८ लाख रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे एकूण ७११ मोबाईल संच 1 जानेवारी ते ३१ एप्रिल २३ म्हणजे, अवघ्या चार महिन्यांत हस्तगत करण्यात आले आहेत.
मोबाईल शोधाकरीता ‘टार्गेट मोबाईल हँडसेटस्’ असे विशेष पथक तयार करुन जास्तीतजास्त मोबाईलचा शोध घेण्याबाबत वेळोवेळी सुचना आणि मार्गदर्शन केले होते.
गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला व हरवलेले मोबाईल फोन मुळ मालकांना मिळाल्यामुळे उपस्थित नागरिकांच्या चेह-यावर समाधान झळकत होते. त्यांनी पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. हा कार्यक्रम उपायुक्त गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.
सध्याच्या काळात मोबाईल संच हा सर्वांसाठी महत्वाचा झाला असल्याने त्याला जीवापाड सांभाळले जात असताना तो सापडला नाही, गायब झाला किंवा चोरीला गेला की संबंधितांची दैना होते. त्याची दखल घेऊन परिमंडळ एक ठाणेमधील पोलीस स्थानकांच्या स्तरावर मालमत्ता विरोधी गुन्हे व प्रॉपर्टी मिसिंग प्रकरणात मोबाईल हरवले, मोबाईल चोरीला गेल्याबाबतच्या तक्रारी नोंंदवण्यात आल्या होत्या. अशावेळेस तक्रारदारांकडून त्यांच्या मोबाईलचा आयएमईआय क्रमांक व मोबाईल क्रमांक नोंदवला जातो.
याबाबत परिमंडळ स्तरावर हस्तगत करण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे निदर्शनास आल्यामुळे उपायुक्त श्री. गावडे यांनी परिमंडळीय स्तरावर गुन्ह्यातील व चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी शासनाने तयार केलेले ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटीटी रजिस्टर’ (सीईआयआर) पोर्टलचा वापर करुन संकेतस्थळावर हरवलेले आणि चोरीस गेलेल्या मोबाईलधारकांची वैयक्तिक माहिती भरून तसेच आयईएमआयचे सीडीआर मागवून मोबाईल निगराणीखाली ठेवून एकूण विविध कंपनीचे ७११ मोबाईल हस्तगत करण्याची कामगिरी पोलीस उपायुक्त १ परिमंडळातील अधिकारी आणि पोलीसांनी बजावली.
ठाणेनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस नाईक खरटमल, नौपाड्याचे उपनिरीक्षक विनोद लभडे आणि कॉन्स्टेबल गंगाधर तिर्थकर, राबोडीचे उपनिरीक्षक महादावाड आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल दीपा दृष्यंत, कळवा येथील उपनिरीक्षक दीपक घुगे आणि पोलीस नाईक राहुल पवार, मुंब्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले आणि पोलीस हवालदार अजिज तडवी, शिळ डायघरचे सहाय्यक निरीक्षक प्रदीप सरफरे आणि पोलीस नाईक अस्लम जमादार, परिमंडळ एक कार्यालयातील पोलीस उपनिरीक्षक मकानदार आणि पोलीस नाईक समाधान माळी यांनी या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष कामगिरी बजावली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नौपाडा पौलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय धुमाळ यांनी तर शिळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सचिन गावडे यांनी आणि कळवा विभागाचे सहाय्यक आयुक्त विलास शिंदे यांनी आभार मानले.
बॉक्स करणे
• हस्तगत केलेल्या मोबाईलचा तपशिल
अॅॅपल आय फोन : २५ /वन प्लस : ३५ / विव्हो : १५२ / ओप्पो : १३६ / एमआय : १३६ / सॅमसंग : १०७ आणि इतर १२० _: एकूण ७११
• हरवलेले तसेच गुन्ह्यातील रिकव्हर केलेले मोबाईल
ठाणेनगर, नौपाडा, राबोडी, कळवा, मुंब्रा, शिळ डायघर, परिमंडळ एक कार्यालय मिळून मिसिंग ५१० मोबाईलचा शोध लावला, २०१ गुन्ह्यातील मोबाईल शोध लावला आहे. असे मिळून एकूण ७११ अशी संख्या आहे.