सोलारिस ठाणे मॅरेथॉन मध्ये ७०० स्पर्धक सहभागी

ठाणे : मेंदू व मणक्यांच्या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या सोलारीस ठाणे मॅरेथॉन स्पर्धेत ७००हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या धावपटूंमध्ये २००हून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी विशेष सहभाग घेतला होता.

ब्रेन व मेंदू आजारांवर मात केलेल्या ५० हून अधिक रुग्णांनी या मॅरेथॉन स्पर्धेत आपली उपस्थिती दाखविली होती. सध्याच्या आधुनिक युगात बैठी जीवनशैली तसेच बिघडलेल्या खाद्य संस्कृतीमुळे मेंदू व मणक्याच्या विकारांचे वाढत असलेले रुग्ण पहाता या आजारांविषयी सामान्य जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी घोडबंदर रोड, ठाणे येथिल सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ५ ते १० या वेळेत ‘सोलारिस ठाणे मॅरेथॉन.. रन फॉर ब्रेन अँड स्पाईन’ या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कासारवडवली ते कोरम मॉल या मार्गावर आयोजित केलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुंबई, पुणे नाशिक ठाणे व पालघर येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘अभी तो मै जवान हूँ ‘ असे म्हणत धावणारे ज्येष्ठ नागरिक तरुणाचा उत्साह वाढवीत होते. इंडियन मेडिकल असोसिएशन-ठाणे शाखा, जनरक्षा वैद्यकीय संस्था, ठाणे, इंडियन सोसायटी ऑफ अन्यस्थेशिया, घोडबंदर डॉक्टर असोसिएशन , फिजिथेरेपी कॉलेज-कोलशेत , ठाणे पोलीस, ठाणे वाहतूक विभाग, एअर फोर्सचे अधिकारी व कर्मचारी तसेच ठाण्यातील सर्व रोटरी क्लब, लायन्स क्लब व ठाण्यातील इतर अनेक नामांकित संस्था व ठाणे व कल्याण येथील स्पोर्ट असोसिएशन या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

आजच्या जीवनशैलीत ‘एग्झरसाईज’ जीवनातून हद्दपार झाला आणि केवळ ‘एग्झरशन’ उरले! अमेरिकन लोकांच्या जीवनशैलीबरोबरच त्यांचे आजारही आपण उचलले आहेत. ही जीवनशैली लहानपणापासूनच मणक्यांचे आजार होण्यास कारणीभूत ठरते. पंधराव्या वर्षी कोणतेही शारिरिक श्रम न करताही मणक्यांची चकती घसरण्याचा अर्थात ‘स्लिप डिस्क’चा आजार आजच्या तरुण -तरुणींना होत आहे, हि मॅरेथॉन मेंदू व मणक्याच्या आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी या वर्षातील आमची हि पहिली पायरी असून २०२४ मध्ये आम्ही संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सेमिनार- चर्चासत्रे तसेच मेंदू व मणक्याविषयी आरोग्य शिबिरे आयोजित करणार आहोत, अशी माहिती सोलारीस हॉस्पिटलचे संचालक व मेंदूविकारतज्ञ डॉ. दीपक ऐवळे यांनी दिली.