उर्वरित कामासाठी पुन्हा तीन दिवसांचा ब्लॉक
ठाणे: खड्ड्यात गेलेल्या गायमुख घाट दुरुस्तीचे प्रशासनाने हाती घेतलेले काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. केवळ या मार्गावरील खड्डे न बुजवता प्रशासनाने तीन दिवसांचा ब्लॉक घेत रस्ता खरवडून त्यावर खडी, डांबराचा थर चढवला आहे. आता त्यावर अंतीम मास्टीकचा थर चढवल्यानंतर ही दुरुस्ती शंभर टक्के फत्ते होणार आहे. मात्र त्यासाठी पुन्हा सलग तीन दिवसांच्या ब्लॉकची गरज भासणार आहे.
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील आणि ठाणे-पालघरला जोडणारा गायमुख मार्ग गेल्या काही महिन्यांपासून येथील खड्ड्यांमुळे वादात सापडला आहे. हा घाटमार्ग मजबूत करण्यासाठी अनेक दुरुस्तीचे प्रयोग करण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न खड्ड्यात गेले. पावसाळ्यात या मार्गाची अवस्था दयनीय झाली. अवघ्या अर्धा किलोमिटरच्या प्रवासासाठी अडीच ते तीन तास रखडपट्टी सहन करावी लागत होती. यासंदर्भात वारंवार टीकेची झोड उठत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात येत नव्हती.
अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पालघर दौर्यादरम्यान या मार्गाचा अनुभव आला. त्यांनी सर्व संबंधित अधिकार्यांची कानउघडणी केल्यानंतर शुक्रवार ८ ऑगस्टपासून या मार्गाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली.
घाटमार्गाचे रुंदीकरण होत नाही तोपर्यंत कितीही दुरुस्ती केली तर ती व्यर्थ जाणार आहे. त्यामुळे आधी या मार्गावरील केवळ खड्डे बुजवण्याचे ठरवण्यात आले. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा या रस्त्याची पाहणी करत संपूर्ण रस्ता खरवडून मास्टिक तंत्रज्ञान वापरण्याचे आदेश दिले. त्यानुसार ८ ते १० ऑगस्ट या कालावधीमध्ये हे काम फत्ते करण्याचे ठरले. त्यानुसार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ, पालिका आयुक्त सौरभ राव आणि मीरा-भाईंदर पालिका आयुक्तांच्या देखरेखीखाली हे काम करण्यात आले. यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील आतापर्यंत दुरुस्तीचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून ३० टक्के दुरुस्ती शिल्लक आहे.
गायमुख रस्ता दुरुस्त करताना तो खोदून त्यावर सर्वप्रथम खडीचा थर टाकण्यात आला आहे. त्यानंतर त्यावर डांबराचे दोन थर अंथरण्यात आले आहेत. मात्र हे काम आणखी मजबूत व्हावे किंबहूना गायमुख रुंदीकरणापर्यंत रस्ता रहदारीसाठी सुखकर असावा यासाठी आता त्यावर मास्टिकचा थर टाकण्यात येणार आहे. त्यानंतरच हे काम फत्ते होणार आहे.
गायमुख रस्ता दुरुस्तीसाठी शुक्रवारी पहाटेपासून ते रविवारी मध्यरात्रीपर्यंत या मार्गावरील रहदारी टप्प्या टप्प्याने बंद ठेवत ब्लॉक घेण्यात आला होता. यादरम्यान सर्वप्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली होती. मास्टिकचे काम शिल्लक असले तरी आता हा रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
घाट रस्त्याच्या चढणीला असलेला मार्ग तापदायक ठरला होता. उर्वरित रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे आहेत. त्यामुळे प्रशासनाने आवश्यक असलेला अर्धा किलोमिटरचा रस्ता मजबूत केला आहे. उर्वरित मार्गावर पडलेले खड्डेही बुजवण्याचे काम सुरू असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
उर्वरित ३० टक्के कामासाठी जिल्हाधिकार्यांच्या नेतृत्वात लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये काम केव्हापासून सुरू करायचे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या ब्लॉकवर चर्चा होईल, अशी माहिती वाहतूक विभागाचे उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी दिली.