अग्निसुरक्षेसाठी ७० मीटर उंचीचे अद्यावत वाहन सज्ज

बदलापूर-अंबरनाथ नगरपरिषदांचा एकत्रित उपक्रम

अंबरनाथ: वाढत्या शहरीकरणाबरोबर निर्माण होणाऱ्या उत्तुंग इमारतींना आपत्तीपासून संरक्षण देण्यासाठी 70 मीटर उंचीचे अद्ययावत सुसज्ज अग्निसुरक्षा वाहन बदलापूर आणि अंबरनाथ नगरपरिषदांनी एकत्रितरित्या आणले असून ते वाहन अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरांचे नागरीकरण झपाट्याने वाढत आहे, पूर्वीच्या आठ, नऊ मजली इमारतींच्या जागी आता 20-20 मजली टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. या इमारतींमध्ये आपत्ती अथवा आगीसारख्या घटना घडल्यास त्यापासून संरक्षण मिळावे यासाठी अंदाजे १७ कोटी रुपये किमतीचे एरियल लेडर प्लॅटफॉर्म (एएलपी) वाहन खरेदी केले आहे, यासाठीचा येणारा खर्च दोन्ही नगरपरिषदेने निम्मा-निम्मा केला आहे. याशिवाय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जिल्हा नियोजन समितीमधून साडेचार कोटी रुपये दिले आहेत. दुर्घटना घडल्यास हे वाहन घटनास्थळी जाऊन आगीवर नियंत्रण मिळवणे तसेच उंच ठिकणी अडकलेल्या नागरिकांची सुखरूप सुटका करण्याचे काम करणार आहे.

वाहन खरेदीबाबतचे सर्व ठराव, प्रस्ताव अनुमती आदी कायदेशीर प्रक्रिया बदलापूर नगरपरिषदेने केली. त्याशिवाय खासदार कपिल पाटील, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार किसन कथोरे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी, दोन्ही नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्या सहकार्यातून वाहन खरेदीचा एकत्रित निर्णय झाला.

फिनलेंड देशातून ब्रांटो कंपनीचे अद्ययावत वाहनाला भारतात समुद्रमार्गे येण्यासाठी 44 दिवसांचा कालावधी लागला. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून बदलापूर आणि अंबरनाथमध्ये इमारतींमध्ये आपत्तीसारख्या घटना घडल्यास अगदी कमी वेळेत एएलपी वाहन घटनास्थळी हजर होणार आहे. वाहन चालवणे, त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित कंपनीची असून त्यादृष्टीने पुरेसा कर्मचारी वर्ग पुरवण्यात आला आहे.

एएलपी वाहन एकत्रित खरेदीबाबत 2018 साली बदलापूर नगरपरिषदेने केलेल्या ठरावाला तत्कालीन सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीनी मंजुरी दिली होती. बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, अंबरनाथचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी अभिषेक पराडकर यांनी याबाबत पाठपुरावा केला होता. बदलापूर नगरपरिषदेचे अधिकारी किरण गवळे, अग्निशमन दलप्रमुख भागवत सोनोने यांच्या प्रयत्नातून एएलपी वाहन शहरांत आपत्ती ओढवल्यास मुकाबला करण्यास खंबीरपणे सज्ज झाले आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ दोन्ही नगरपरिषदांनी एकत्रित भव्य सुसज्ज अग्नि सुरक्षेसाठी वाहन खरेदी केले आहे. लवकरच वडवली येथे तलावशेजारील पालिकेच्या राखीव जागेत दोन्ही शहरांच्या मध्यभागी फायर स्टेशन उभारण्यात येणार आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची आपत्ती अथवा दुर्घटना घडल्यास वाहन घटनास्थळी पोहोचू शकेल आणि वेळीच नियंत्रण मिळवण्यात येईल, अशी माहिती बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी दिली.