नमुंमपाची 606 कोटींची विक्रमी मालमत्ताकर वसूली

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या सुयोग्य निर्णयांमुळे विद्यमान आर्थिक वर्ष संपण्याच्या एक दिवस आधीच म्हणजेच 30 मार्च रोजी दुपारपर्यंत अर्थसंकल्प 2022-23 मध्ये दिलेले रू. 575 कोटी रक्कमेचे उद्दिष्ट पार करीत 606 कोटी सहा हजार रुपये इतकी रक्कम मालमत्ताकरापोटी वसूल केलेली आहे.

यावर्षी पहिल्यांदाच मालमत्ताकराची 600 कोटीपेक्षा अधिक विक्रमी वसूली झालेली असून हा निधी महानगरपालिकेच्या वतीने नागरी सुविधा पूर्ततेसाठी खर्च केला जात असल्याने नागरिकांच्या सहकार्याबद्दल आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नवी मुंबईकर नागरिकांचे आभार मानले आहेत.

यावर्षी नागरिकांनी आपला मालमत्ताकर विहित वेळेत भरावा यादृष्टीने विविध माध्यमांतून आवाहन करण्यात आले होते. कोरोना कालावधीत नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते याचा साकल्याने विचार करून पुन्हा एकवार थकित मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के सूट देणारी अभय योजना 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत जाहीर करण्यात आली होती व त्यानंतरही 16 मार्च ते 31 मार्चपर्यंत 50 टक्के सूट देण्यात आलेली होती.

नागरिकांनी अभय योजनेचाही मोठ्या प्रमाणावर लाभ घेतल्याचे चित्र पहायला मिळाले. एकूण 12068 व्यक्ती, संस्थांनी अभय योजनेचा लाभ घेत 109.37 कोटी इतकी रक्कम जमा केली.

सन 2019-20 या कालावधीत 558 कोटी असलेली मालमत्ताकर वसूली, सन 2020-21 मध्ये 534 कोटी इतकी होती. सन 2021-22 या मागील वर्षी 526 कोटी इतकी मालमत्ताकर वसूली होती ती यावर्षी सन 2022-23 मध्ये आर्थिक वर्ष संपण्यास दीड दिवस बाकी असतानाच 30 मार्च रोजी दुपारपर्यंत 606.06 कोटी इतकी झालेली आहे.

10 लक्ष रक्कमेहून अधिक थकबाकी असणा-या 150 हून अधिक थकबाकीदारांच्या मालमत्तांची अटकावणी करण्यात आलेली होती. त्यापैकी 100 हून अधिक थकबाकीदारांनी लगेचच आपल्या थकबाकीचा भरणाही केला.