अंबरनाथमध्ये ५९ तर बदलापूरमध्ये ४९ सदस्यांची होणार निवड

२ डिसेंबरला मतदान तर दुसऱ्या दिवशी मतमोजणी

अंबरनाथ: नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर अंबरनाथ तसेच बदलापूरमध्ये राजकीय वर्तुळात उत्साहाचे वातावरण पसरले असून
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. २ डिसेंबरला मतदान होणार असून ३ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. अंबरनाथमध्ये यावेळी 59 सदस्यांसाठी निवडणूक होणार आहे,तर बदलापूरमध्ये ४९ सदस्य निवडून येणार आहेत.

अंबरनाथ पालिकेत १९९५ पासून शिवसेनेचे वर्चस्व आहे. येथे कधी युती तर कधी स्वबळावर निवडणूक झाली आहे आणि निवडणुकीनंतर पुन्हा युती झाल्याचे चित्र येथे पहावयास मिळते आहे. येथे पॅनल पद्धतीने निवडणूक होणार आहे. यासाठी 29 प्रभाग निश्चित करण्यात आले असून 28 प्रभागांत द्विसदस्य तर एका प्रभागात त्रिसदस्य पद्धतीने निवडणुकीत मतदान होणार आहे. बदलापूरमध्ये २४ प्रभागांसाठी निवडणुक होणार आहे, यापैकी 23 प्रभाग द्विसदस्य तर एक प्रभाग त्रिसदस्यीय पद्धतीने निवडला जाणार आहे.

नगराध्यक्षा शिवसेनेचीच होणार
दहा वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर नगरपालिका निवडणुका होणार आहेत. प्रथमपासूनच शिवसेनेचे प्राबल्य असून गेल्या काही वर्षात झालेली विकासकामे दिसून येत आहेत, त्याआधारे याहीवेळी शिवसेनेची सत्ता येईल आणि नगराध्यक्षा शिवसेनेचीच होईल, असा दृढ विश्वास अंबरनाथ शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी व्यक्त केला.

अनेक वर्षांपासून निवडणुक जाहीर होण्याची प्रतिक्षा आता निवडणुका जाहीर झाल्याने संपुष्टात आली आहे, नगरपालिका निवडणुकीच्या निर्णयाचे स्वागत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी (अजितदादा पवार गट) शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी केले. निवडणुकीत विजय प्राप्त करण्याच्या दृष्टीने रणनीती आखली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अंबरनाथ पक्षीय बलाबल (प्रभाग ५७)
शिवसेना २५, भाजपा १०, काँगेस आठ, अपक्ष सात, राष्ट्रवादी पाच, मनसे दोन

बदलापूर पक्षीय बलाबल
शिवसेना २४, भाजपा २०, राष्ट्रवादी दोन, अपक्ष एक

मुरबाड पंचायत समितीच्या १६ जागांकरिता निवडणुका

मुरबाड पंचायत समितीच्या १६ जागांकरिता निवडणुका होणार असून यात डोंगरन्हावे (अनु.जाती प्रवर्ग), नारीवली (सर्वसाधारण), धसई (नामाप्र प्रवर्ग), खोपिवली (सर्वसाधारण महिला राखीव), वैशाखरे (नामाप्र महिला राखीव), फांगुळगव्हाण (अनु.जमाती प्रवर्ग), माळ (अनु.जमाती महिला राखीव), तळेगाव (अनु.जमाती प्रवर्ग), सरळगाव (सर्वसाधारण महिला राखीव), किसळ (नामाप्र प्रवर्ग), कुडवली (नामाप्र महिला राखीव), शिवळे (सर्वसाधारण), शिरवली (सर्वसाधारण महिला राखीव), म्हसा (अनु.जाती(st)स महिला राखीव), देवगाव (सर्वसाधारण महिला राखीव), आणि आसोळे (सर्वसाधारण) या जागांचा समावेश आहे.