बदलापुरात ५८ टक्के मतदान !

* तीनवेळा मतदानामुळे गोंधळ
* हाणामारीच्या तुरळक घटना
* १४८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

बदलापूर: बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी किरकोळ हाणामारीच्या तुरळक घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. बदलापुरात ५८.३० टक्के मतदान झाले असून नगरसेवक पदाच्या १४३ आणि नगराध्यक्ष पदाच्या पाच अशा १४८ उमेदवारांचे भवितव्य मतदारराजाने मशिनबंद केले आहे.

पाच वर्षांपूर्वी करोनामुळे रखडलेल्या कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी सहा जागा वगळून मतदान पार पडले. गेल्या महिनाभरापासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी सभांमधून दिलेली शहर विकासाची आश्वासने, राजकीय नेत्यांमध्ये रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी तसेच काही ठिकाणी पैसे वाटपाचे झालेले प्रयत्न यामुळे यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यामुळे मतदारांकडून मतदानाला कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

बदलापुरात २००५ नंतर पहिल्यांदाच नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत. दहा वर्षानंतर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली असून यात पहिल्यांदाच पॅनल पद्धतीने निवडणूक झाली असल्याने सकाळी मतदार मोठ्या उत्साहाने मतदानाला बाहेर पडले. आज पुरुष मतदार 68, 591 तर 62,782 महिला मतदार अशा एक लाख ३१ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदार याद्यांच्या गोंधळामुळे अनेक मतदारांची त्यांचे मतदान केंद्र शोधताना तारांबळ उडाली. एका प्रभागात वास्तव्य आणि मतदान मात्र दुसऱ्याच विभागात अशी स्थिती काही ठिकाणी पहायला मिळाली. तर मतदान केंद्रापर्यंत मतदारांना नेण्यासाठी अनेक उमेदवारांनी रिक्षा, वाहनांची सोय उपलब्ध केली होती. तसेच यंदा शिवसेना, भाजप यांचे शहरभर एकाच रंगाचे युनिफॉर्म स्वरूपाचे नवीन, आकर्षका बुथ राजकीय पक्षांची विशेष ओळख ठरत होते. बुथवर लॅपटॉपसह असलेले तरूण, तरूणी मतदारांना मार्गदर्शन करत होते. दरम्यान, प्रभाग क्रमांक २२ मध्ये मतदान केंद्राबाहेर शिंदेंची शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यात राडा झाला. तर प्रभाग क्रमांक सहामध्ये भाजपा व शिंदेच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आपसात भिडल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हे काही तुरळक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले.