व्हॅलेंटाईन डे ला ५४ जण ‘लग्नाच्या बेडीत’
* दोघींनी पटकावला फॉरेनचा नवरा
* दोन ज्येष्ठ घटस्फोटीत जोडप्यांचेही शुभमंगल
ठाणे : हिंदू पंचांगाप्रमाणे १४ फेब्रुवारीला शुभदिन होता खरा, पण लग्नासाठी शुभ मुहूर्त मात्र नव्हता. मुहूर्त असो वा नसो, नव्या पिढीत हा दिवस जणू शुभ मुहूर्त म्हणूनच रुजला आहे. निबंधकाकडे या दिवसाचे आधीपासूनच आरक्षण करून १४ फेब्रुवारीला ५४ जण लग्नाच्या बेडीत अडकले. यात ठाण्यातील दोघींनी फॉरेनचा नवरा पटकावला तर दोन ज्येष्ठ घटस्फोटित जोडप्यांचेही शुभ मंगल झाले.
१४ फेब्रुवारीचा मुहूर्त साधून लग्न करण्याचे फॅड तरुणाईत मोठ्या प्रमाणात रुजले असून यंदा हा मुहूर्त साधून ठाण्यातील विवाह उपनिबंधक कार्यालयात नववधूवरांसह दोन घटस्फोटीत जोडपी आणि दोन फॉरेनर वरांसोबत दोघी जणी असे ५४ जण बुधवारी लग्नाच्या बेडीत अडकले.
ठाणे पश्चिमेकडील तलावपाळी परिसरात विवाह नोंदणीसाठी दुय्यम सहनिबंधकांचे कार्यालय आहे. जिल्ह्याभरातून इथे विवाहेच्छुक मंडळी विवाह नोंदणीसाठी येत असतात. १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे चा मुहूर्त साधत बुधवारी ठाण्यातील या विवाह नोंदणी कार्यालयात नववधुवर आणि वऱ्हाडी मंडळीची झुंबड उडाली होती. या दिवशी तब्बल ५४ जोडपी लग्नाच्या बेडीत अडकली. यात ५८ ते ६० वयोगटातील दोन घटस्फोटीत जोडपी असून दोन ठाणेकर तरुणींनी फॉरेनचा नवरा पटकावून शुभमंगल करीत संसाराची रूजवात केली.
गतवर्षी व्हॅलेंटाईन डे ला ३४ जणांनी विवाह केला होता तर यंदा ५४ जण लग्नाच्या बेडीत अडकले, अशी माहिती विवाह उपनिबंधक संजय भोपे यांनी दिली.